पुणे : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होत असतात. बोर्डाचे पेपर झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. यामुळे निकालाबदल विद्यार्थी आणि पालक यांच्यात निकाल कधी लागणार याबद्दल संभ्रम निर्माण होत होता. आता तो संभ्रम दूर झाला असून आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
तसंच दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. सध्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल तयार करण्याचं काम सुरु असून 10 जूनपर्यंत बारावी तर 20 जूनपर्यंत दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. या दोन्ही बोर्डच्या परीक्षा उशिरा सुरु झाल्या असल्यामुळे आम्ही बारावीचा 10 जूनपर्यंत आणि 20 जूनपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करु असं बोर्डानं म्हटलं आहे.
तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. तसंच दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामधील 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामुळे आता दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि पालक यांची चिंता कमी झाली आहे.