लेखणीला कामाच्या व्यापातून थोडी विश्रांती दिली होती. आमच्या तबला या विश्वात फर्माईशी चक्रधार असते, तसा हा लेख एक फर्माईश आली, म्हणून लिहिलाय आणि कंटेंटपण कोणीतरी कवीला केलेल्या फर्माईशीला कवितेतून दिलेले उत्तर आहे. इतर काहीच पत्र म्हणून लिहिलेले नाही… फक्त अप्रतिम असे काव्य… इथे दिसेल…
अठरावे शतक संपले. पेशवाई १८१८ मध्ये लयाला गेली आणि मराठी मुलखात इंग्रजांचा अंमल सुरू झाला. मराठी राजवट तंजावर ते ग्वालियर आणि बडोदा ते बंगाल अशी पसरली होती. भाषेतील उत्क्रांती ही त्या त्या भागातील तत्कालीन सरकार आणि जनता यातून घडत असते. मायमराठीसुद्धा फारसी भाषेच्या जोखडात अडकली होती. दीर्घ काळ मुघल, पर्शियन, तुर्क असे विविध राज्यकर्ते, सुलतान, नवाब पंजाब ते हैदराबाद आणि सिंध ते बंगाल या मातीत पसरले होते. त्यात काही इंग्रजी अंमल असणारेही भाग होते, तो हा माळवा प्रांत हा या नकाशाचा मध्य. काही पारतंत्र्यात काही स्वतंत्र… अनेक वर्षे समशेर गाजविणारे शिंदे, होळकर, तांबे, पवार यांची ग्वाल्हेर, इंदोर, झाशी, धार येथे छोटी छोटी संस्थाने होती. त्याच माळवा प्रांतात १८५७ चा उठाव झाला खरा, पण ग्वाल्हेरचे कलेचे आणि कलाकारांचे कदरदान असणारे शिंदे घराणे कायम राहिले. त्यांच्या दरबारातील मराठीवरील इतर भाषांचे गारुड फेकून देऊन अस्सल मराठी भाषेत काव्य रचणारे “राजकवी” या माझ्या आजच्या लेखाचे नायक. कविश्रेष्ठ भा. रा. तांबे!! प्रकाशक मित्राने कविता लिहून द्या, असा तगादा लावला, फर्माईशपर पत्रे पाठवली.
तेव्हा उत्तर म्हणून काय लिहावे, आपला कवित्वाचा काळ संपत आलाय, नेत्र पैलतीरी असलेल्या देवाकडे पाहत आहेत, अरे इतकी वर्षे माझ्या काव्यसुमनांनी मी तुझी ओंजळ भरली आहे, आता पुरे की असे सांगणारी ही कविता. प्रतिभेचा मधुघट आता रिता होत चालला आहे… थांबण्याची वेळ आली आहे. तेव्हा देवासाठी राखून ठेवलेली एकच नैवेद्याची वाटी आणि कोरांटीचे फूल राहू दे माझ्याजवळ असे म्हणणारे भा. रा… विलक्षण प्रतिभेचे धनी. सात्विकता, गेयता, मृदुता, नादमाधुर्य, एकचि ओळ लिहूनी अनेक अर्थ देणारे महान कवी. लहानपणी शाळेत छोट्या-छोट्या कविता लिहीत लिहीत राजकवीपदापर्यंत पोहोचले. तोचतोपणा येतोय किंवा प्रतिभेची उंची आहे तिथे स्थिर झाली, हे लक्षात येताच पाच वर्षे लेखणीला विश्रांती किंवा विराम देणारे स्वतःच्या प्रतिभेकडे त्रयस्थ दृष्टीने बघणारे असे होते. त्यानंतर त्यांनी तब्बल ३३ गीते लिहिली. सर्वच्या सर्व तुकारामांच्या गाथेसारखी आणि माऊलीच्या पसायदानासारखी काळाच्या कसोटीवर उतरणारी ठरली, प्रदीर्घ काळ टिकणारी!! त्यातील हे एक गीत मधु मागसी माझ्या सख्या परी… पेश ए खिदमत है…
मधु मागसी माझ्या सख्यापरी,
मधु घटची रिकामे पडती घरी…
आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पाजिला तुला भरोनी
सेवा ही पूर्वीची स्मरोनी
करी न रोष सख्या दया करी…..
नैवेद्याची एकच वाटी
आता दुधाच्या माझ्या गाठी
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशी तरी…
तरुण तरुणींची सलज्ज कुजबुज.
वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज
संसाराचे मर्म हवे तुज
मधु पिळण्यापरी बळ न करी…
ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया
आता मधुचे नाव का सया
लागले नेत्र रे पैलतीरी…
मधु मागसी माझ्या सख्या परी…
ज्या उंचीची त्यांची प्रतिभा होती ती कल्पनातीत आहे. इंग्रजी, उर्दू, मराठी सर्व भाषांवर प्रभुत्व… त्यामुळे इंग्लिशमधील sonnet किंवा मराठीत सुनीत ज्याला म्हणतात त्या काव्यप्रकारात माहिरत त्यांनी हासिल केली होती.
गूढ काव्य किंवा गूढगुंजन म्हणूया असे लिखाण त्यांचे वेगवेगळे अर्थ निघणारे माँ सरस्वतीचा आशीर्वाद असल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. त्यात लताबाईंचा दैवी आवाज, भीमपलास रागावर आधारित आठ मात्रांमध्ये चाल बांधणारे प्रभू वसंत… कुठलेही भावगीत सुरांच्या नभी विहार करणारे असे तयार करायचे… गोड आणि लडिवाळ… आणि या त्रिवेणी संगमातील सर्वात महत्वाचे म्हणजे भा. रा. तांबे यांचे शब्द…
एकोणिसाव्या शतकात त्यांचा जन्म झाला. आज एकविसाव्या शतकात २०२२ अर्धे अधिक सरले तरीही मला लिहावेसे वाटले, यातच सारे काही आले. आपल्याच काव्यप्रकारांवर सलज्ज कुजबुज, गूढ असे ते स्वतः तिसऱ्या कडव्यात स्पष्ट म्हणतात. उत्तम संसारसुद्धा त्यांनी केला, त्याचे मर्म जाणिले. परंतु आता त्यांना निवृत्तीचे वेध लागलेत… बळ नको रे वापरूस, मी लिहून काय देऊ? प्रतिभेचा झरा आटत चालला आहे रे. इतके संतत्व? कमाल… आयुष्याची संध्याकाळ जवळ येतेय आणि ऐलतीरी मनुष्यजन्म आहे तो मी जगलोय आता जीवनप्रवाहाच्या पैलतीरी तो देव आहे, त्याच्यासाठी एकच शिल्लक असलेली दुधाची वाटी आणि हे कोरांटीचे फुल घेऊन त्याला अर्पण करू दे, असे ते मित्राला न दुखवता विनवित आहेत. क्या बात है… कसली विलक्षण प्रतिभा आहे नाही ? जे न देखे रवी ते देखे कवी… हा लेख लिहिताना अनेकदा माझ्या डोळ्यातूनही अश्रूंचा धबधबा कोसळला आहे. प्रथमच खूप ब्रेक घेतले लिहिताना… अनेकटाकी लेखन… शुक्रिया मंदार ओक सर… आपने फर्माया और मैं थोडा बहोत लिख पाया… उपरवाले की दुवा… माझ्या सर्वात आवडत्या विषयावर लिहायला मिळाले हे माझे परमभाग्यच… खूप लिहू शकलो असतो… पण आता बास… सहन होत नाहीये. प्रत्येक जण त्याच्या विचारानुसार अर्थ काढू शकेल इतके वैश्विक, गूढ आणि सोज्वळ कविता लिहिणारे भारा… अमर असतील किंवा आहेत, असे मला प्रामाणिकपणे वाटते. हे गाणे जरूर ऐका आणि एन्जॉय करा.
–शैलेश बुरसे