मुंबई | राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान जोरदार भाषण केले. आभार भाषाणादरम्यान, नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंनी हिरकणी गाव वाचवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित गाव वाचवण्यासाठी शासनातर्फे 21 कोटींच्या निधीची घोषणा केली. याशिवाय लवकरच पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून सामान्यांना दिलासा देणार असल्याचीही ग्वाही दिली आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या काळात सामान्या जनतेला दिलासा मिळणार असल्याचं शिंदे म्हणाले.
जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशातील काही राज्यांनी काही प्रमाणात व्हॅट कमी केला होता. मात्र, आपल्या राज्याने एक पैशाचाही व्हॅट कमी केला नव्हता. परंतु, राज्यात नव्याने अस्तित्त्वात आलेले युतीचे सरकार लवकरच यावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेईल आणि महागाईने त्रस्त सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम करेल, अशी ग्वाही देखील शिंदेंनी यावेळी दिली.