विधान परिषदेसाठी सुरू आहे फोडाफोडीचे सत्र

मविआमध्येच नाही ताळमेळ

सहा जण निवडून येणार : चंद्रकांत पाटील
महाविकास आघाडीतील बेबनावाचा फायदा भाजपला होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. अपक्षांना स्वत:चे मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील, असेही पाटील म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या निवडणुकीतदेखील भाजपला ११ मतांची गरज होती. ती कशी मिळणार, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, ती मते मिळाली, आमचा उमेदवार विजयी झाला, असेही पाटील म्हणाले.

मुंबई : राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच आता आपापल्या उमेदवारांसाठी परस्परांच्या समर्थक आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने आघाडीतच बिघाडी होणार की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. राज्य विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेतून ६ ते २१ जुलै २०२२ या कालावधीदरम्यान निवृत्त होणार्‍या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक होणार आहे.
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी, तसेच विरोधी भारतीय जनता पक्षाने आपापल्या आमदारांना शनिवारी मुंबईत दाखल होण्याचे फर्मान सोडले होते.

परंतु आघाडीतलेच उमेदवार आणि नेते लहानलहान पक्ष, तसेच अपक्ष आमदारांशी परस्पर संपर्क साधत असल्यामुळे; तसेच ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत असल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी शुक्रवारीच आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले. सह्याद्री अतिथीगृहात आमदारांची एक बैठकही घेण्यात आली.

त्यानंतर त्यांची रवानगी थेट वेस्टइन हॉटेलमध्ये करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून त्यांच्या आमदारांना शनिवारी सकाळी मुंबईत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था नरीमन पॉईंटच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये करण्यात येणार आहे. भाजपनेही आपल्या आमदारांना कुलाब्याच्या हॉटेल ताज प्रेसिडेन्सीमध्ये उतरविण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचे बहुसंख्य आमदार त्यांच्या परिसरात ईडीच्या राहुल गांधींविरुद्धच्या कारवाईच्या निषेधार्थ चाललेल्या आंदोलनात गुंतले आहेत. तरीही त्यांनी शनिवारपासून मुंबईत उपलब्ध राहावे, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. त्यांची सोय कुठे करायची हे अद्याप निश्चित झालेले नाही.

राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल, हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही. यावेळी उमेदवारांचा कोटा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. मत बाद होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

या सर्व आमदारांना मतदान कसे करायचे, त्यासंबंधी सर्व मार्गदर्शन करण्यात येईल. आमच्या दोन आमदारांना मतदानाचा अधिकार नाकारला, त्यामुळे अपक्षांच्या मदतीने हे कसे भरून काढायचे हे पाहिले जाईल, असे अजित पवार म्हणाले. बहुजन विकास आघाडीला सर्व जण जाऊन भेटले, त्यांची मते आपल्याला मिळावीत, यासाठी आम्हीही प्रयत्न करीत असल्याचे अजित पवार म्हणाले. आजच्या घडीला २८४ आमदार मतदान करतील, अशी शक्यता लक्षात घेता विजयी आमदारांना २६ मतांची गरज आहे. ११ पैकी १० उमेदवार निवडून येणार आहेत.

Prakash Harale: