मुंबई : गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. त्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे लागलं आहे. येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच एक आदिवासी महिला उमेदवार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी भाजपकडून द्रौपदी मुर्मू तर त्यांच्या विरोधात युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांना देशभरातील अनेक पक्षांन पाठिंबा दर्शवित आहे. तर महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात असलेल्या शिवसेनेने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील त्यांना पाठिंबा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा द्यावा. शरद पवार महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. आदिवासींना आता सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. पहिल्यांदाच आदिवासींमधून एक महिला राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचल्या आहे. त्यांचा प्रवास खडतर आहे हे लक्षात घेतल पाहिजे. त्या भाजपच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या उमेदवार आहेत असा विचार न करता त्यांना पाठिंबा द्यावा. असं राणा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी स्वत: शरद पवार यांना विनंती करते की, त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा द्यावा. असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. द्रौपदी मुर्मू यांना अनेक प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दर्शविला असल्याने निवडणुकीत मुर्मू यांचं पारड जड दिसत आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस मुर्मू यांना पाठींबा देणार का याकडे सर्वांच लक्ष लागल आहे.