गुरू आणि शिष्य नाते म्हणजे व्यापक विचारांची देवाणघेवाण

अभिराम भडकमकर | लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता |

भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला खूप महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीचे एक वेगळेपण म्हणजे केवळ मनुष्य म्हणून आपण गुरूकडे बघत नाही. कुठेही चांगलं काही आपल्यासाठी घेण्यासारखं असेल, तर त्या गोष्टीला आपण गुरू मानतो. म्हणजे आपण निसर्गाला, आई-वडिलांना जे प्रत्यक्ष आपल्याला शिकवतात त्यांना पण आपण गुरू मानतो .

त्याचबरोबर निर्जीव पुस्तकांना , ग्रंथांना देखील आपण गुरू मानतो. त्यामुळे जिथून जिथून आपल्याला जे काही शिकायला मिळेल किंवा ज्यात नावीन्य असेल ती प्रत्येक गोष्ट आपल्याला गुरुस्थानी आहे असं आपण मानतो .हा आपल्या भारतीय संस्कृतीचा वैशिष्ट्यपूर्ण असा विषय आहे. आपण गुरू म्हणून जेव्हा एखाद्याला नमस्कार करतो त्यावेळेला असं मानलं जातं की, त्या गुरूचीदेखील तितकीच जबाबदारी असते, ती अशी की, त्या गुरुस्थानी आपण किती योग्य श्रेष्ठ आहोत हे समजून-उमजून संस्कारमय वागणे. गुरू म्हणून घेताना तेवढा व्यासंग पाहिजे.

आपला अभ्यास असला पाहिजे. आपण समोरच्याला तितकंच अभ्यासात्मक विचार दिले पाहिजे किंवा त्या देण्याचे योग्य तेथे आपण असले पाहिजे. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा ज्याला आपण एक उत्सव किंवा एक विशेष दिवस असे म्हणतो तो गुरूंना देखील त्यांची जबाबदारी समजावून सांगणारा आणि शिष्यांना एक दिवस आहे. एका पद्धतीने अमेरिकेमध्ये थँक्स गिविंग डे असतो अशा पद्धतीने भारतामध्ये गुरूला वंदन करण्याचा किंवा गुरूकडून जे मिळाले त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याला खरे तर एकच गुरू नसतो.

आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणारी एखादी व्यक्ती गुरुस्थानी असू शकते. पण आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी गुरू भेटत जातात ते काहीतरी वेगळी दिशा देऊन जातात आणि आयुष्यभर ते आपल्यावर आपल्या मनावर प्रभाव गाजवतात . जसे वसंतराव कानिटकर, जीए कुलकर्णी (ज्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे) यांनी पुढील पिढीसाठी बरेच काही देऊन ठेवले आहे. भारतीय संस्कृतीसाठी गुरुपौर्णिमा हा व्यापक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी उत्तम दिवस आहेच, परंतु नेहमीप्रमाणे प्रश्न उपस्थित होतो एकच दिवस गुरूचे स्मरण करून काय साध्य होणार? पण असा निराशावादी विचार करणे योग्य न ठरता वर्षभर आपण जे शिकलो ते साठवत राहायचं.आणि किमान एक दिवस व्यक्त होऊन गुरूला वंदन करायचं असा हा दिवस आहे.

Dnyaneshwar: