स्व समुपदेशनाची तिसरी पायरी

मागील लेखामध्ये भावनांचे व्यवस्थापन ही स्वसमुपदेशनाची दुसरी पायरी पाहिली आहे. आता तिसरी पायरी म्हणजे विचारांना सवय लावूया ही पाहूया. बहुतांश व्यक्ती परिस्थितीला बदलू शकत नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत मी काय करू शकतो हा दृष्टीकोन ताण-तणाव कमी करून समस्येवर अनेक उपाय सुचविणारा पर्याय असतो. आपली प्रत्येक कृती आपल्या विचारातून निर्माण होत असते.

त्यामुळे आपण आपल्या विचारांना कसे नियंत्रित करायचे ते पाहूया. ज्याप्रमाणे जगण्यासाठी श्वासोश्वास सातत्याने सुरूच असतो त्याचप्रमाणे आपल्या मेंदूमध्ये सुद्धा विचार सतत सुरूच असतात. विचारांना कोणीही थांबवू शकत नाही. सर्वसाधारण व्यक्ती दररोज साठ हजार विचार करीतच असतो. मग आपल्या आवडीचे, आपल्या स्वप्नांचे, आपल्या अपेक्षेचे, आपल्या कर्तव्याचे, आपल्या क्षमता किंवा आपले गुण

वाढविणारे विचार असतील तर आपल्याला ताण-तणावापासून दूर ठेवतात. याविरुद्ध आपले विचार जे आपल्या हातात नसते, आपल्या कुवतीच्या पलीकडचे असते असेच विचार जास्त करतात. भूतकाळातील घटना वारंवार आठवून त्यावर विचार करतात, सतत नकारात्मक विचार करतात त्यांच्या भावना उफाळून निघतात मग अशा व्यक्तीच्या जीवनात दुखं, ताण, काळजी, अपयश, अस्वस्थता, एकटेपणा, उदासीनता आणि नैराश्य प्रवेश करते. आपल्या जीवनात काय मिळवायचे हे आपल्या विचारावर अवलंबून असते.

आपल्या विचारांचे पॅटर्ण कसे आहेत यावर आपला स्वभाव, व्यक्तिमत्व आणि आपले गुण-दोष इतकेच नव्हे तर संपूर्ण जीवन अवलंबून असते. त्यामुळे विचारांच्या पॅटर्णला खूप महत्व प्राप्त झालेले आहे. स्व समुपदेषणात आपल्या विचारांचे पॅटर्ण कसे आहेत, ते कसे असावेत याचा विचार करून आपल्या विचारांचे पॅटर्ण बदलणे हीच स्व समुपदेषणाची तिसरी पायरी आहे.

प्रत्येक व्यक्तीला चांगला जॉब किंवा व्यवसाय, भरपूर पैसा, चांगले घर, गाडी, आनंद, सुख, प्रतिष्ठा हवी असते. यासाठीच प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असतो. परंतु कळतनकळत आपल्याला जे नको आहे तेच विचार आपल्याकडून जास्त होतात. अपयश, भीती, टेंशन, काळजी, असुरक्षितता, अपेक्षेंचा अतिरेक याचेच विचार जास्त निर्माण होतात. त्यामुळे विचारांचे पॅटर्ण चुकीच्या पद्धतीचे आपल्या मेंदूमध्ये तयार होतात. याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो.

स्व समुपदेषणात आपल्या विचारांचे पॅटर्ण आपल्याला जे पाहिजे, जे हवं आहे त्यावर निर्माण करणे जेणेकरून प्रत्यक्ष जे हवं तेच आपल्या जीवनात येते. त्यामुळे परिस्थिती कशीही असो, या परिस्थितीत मला जे हवं आहे तेच मी विचार करणार, माझ्या विचाराचे पॅटर्ण तयार करणार हीच स्व समुपदेषणाची तिसरी पायरी आहे.

Prakash Harale: