उच्च बुद्धिमत्ता, दृढनिश्चयी आणि काम करण्यासाठीची आश्चर्यकारक क्षमता असलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १५० वर्षांपूर्वी लिहिलेला संसर्ग नियंत्रणावरील सल्ला, हात धुण्याचे महत्त्व, पर्यावरणीय स्वच्छता, वायुवीजन, सूर्यप्रकाश, सांख्यिकी डेटा आणि आरोग्य साक्षरता आजच्या कोरोना व्हायरस विषाणूच्या जागतिक लढ्यासाठी अत्यंत संबंधित आहे.
१२ मे जागतिक परिचारिका दिन. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी परिचर्या या क्षेत्रात दिलेल्या अमूल्य अशा योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येणारा दिवस आणि तोही जगभरात. फ्लॉरेन्स नाइटिंगेल १८ व्या शतकातील एक अग्रगण्य परिचारिका, व्यवस्थापक, संशोधक, सुधारक आणि लेखक असे परिचर्या क्षेत्राला लाभलेले एक बहुआयामी नेतृत्व.
म्हणूनच त्यांना आधुनिक परिचर्या व्यवसायाच्या जनक असे म्हटले जाते. त्यांचा परिचय जगाला “lady with the lamp” असाच आहे. या त्यांना मिळालेल्या उपाधीमागे त्यांनी युद्धभूमीवर केलेलं अगाध असं कार्य आहे. युद्धभूमीवरील जखमी सैनिकांची रात्रीच्या अंधारात हातात दिवा घेऊन शुश्रूषा तर त्यांनी केलीच, त्यासोबतच ३८ स्वयंसेवी परिचारिकांसह स्कुटारी येथील रुग्णालयाची साफसफाई आणि नूतनीकरणही केले. त्यामुळे जखमी सैनिकांचा मृत्युदर ४० टक्क्यावरून २ टक्क्यापर्यंत कमी करण्यात त्यांनी यश मिळविले.
लहानपणापासूनच त्यांना गणितात गती होती. त्या बळावरच संख्याशास्त्रातील त्यांचे सर्वांत महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती. स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यांची मृत्युसंख्या व त्याची कारणे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांनी आकृतिबंधाचा वापर केला. कारण एरवी नुसत्या आकडेवारीमध्ये लक्ष घालण्याइतपत वेळ किंवा आत्मीयता अधिकार्यांमध्ये नव्हती. त्यामुळे असे नुसते आकडेवारीतून मांडलेले अहवाल दुर्लक्षित राहात असत; परंतु नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठी वैद्यकीय सेवा अपुर्या पडत आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सेवा सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या कामगिरीमुळे त्या प्रकाशझोतात आल्या आणि त्यांना ‘रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या’ पहिल्या महिला सभासद होण्याचा मान मिळाला.
पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल्स असोसिएशननेही त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले आणि पुढे विज्ञान, कला, युद्ध किंवा व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना बहाल करण्यात येणारा पुरस्कार म्हणजे ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना किंग एडवर्ड यांच्याकडून बहाल करण्यात आला. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लष्करी रुग्णालयात भयंकर अस्वच्छ परिस्थितीत जखमी सैनिक मरताना आढळले. तसेच टायफस, टायफॉइड, कॉलरा, डायरियासारख्या आजारांमुळे लढाईत झालेल्या जखमांपेक्षा दहापट अधिक सैनिक मरत होते. सैनिकांची योग्य काळजी घेतली जात नव्हती. औषधे व इतर आवश्यक गोष्टींचा पुरवठा कमी होत होता. सैनिकांच्या कपड्यांवर किडे, उवा, पिसू होते. इमारतीच्या भिंती, छत अस्वच्छ होते. उंदीर पलंगाखाली येत होते. टॉवेल, बेसिन, साबण नव्हते आणि या सर्व कारणांमुळे रुग्णालयात मृत्यूंची संख्या अधिक होती. नाइटिंगेल यांचा विश्वास होता की, मुख्य समस्या आहार आणि अस्वच्छता या आहेत. त्यामुळे त्यांनी इंग्लंडहून अन्न सामग्री मागवली. तसेच त्यांनी केलेल्या पत्रव्यवहारांमुळे ब्रिटिश सरकारकडून कक्षांची स्वच्छता, गटारे, नाल्यांची स्वच्छता आणि वायुवीजन सुधारण्यासाठी स्वच्छता आयोग पाठविण्यात आला. या सर्व कार्यांसाठी त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प’ हा किताब तर मिळालाच होता, त्यासोबतच लंडन टाइम्सने त्यांना ‘सेवक देवदूत’ असे संबोधले.
अशा उच्च बुद्धिमत्ता, दृढनिश्चयी आणि काम करण्यासाठीची आश्चर्यकारक क्षमता असलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १५० वर्षांपूर्वी लिहिलेला संसर्ग नियंत्रणावरील सल्ला, हात धुण्याचे महत्त्व, पर्यावरणीय स्वच्छता, वायुवीजन, सूर्यप्रकाश, सांख्यिकी डेटा आणि आरोग्य साक्षरता आजच्या कोरोना व्हायरस विषाणूच्या जागतिक लढ्यासाठी अत्यंत संबंधित आहे.
आजच्या दिवशी या सर्व गोष्टींचे स्मरण करून खरोखरच सर्व जगभरातील परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा रुग्णसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कोविड-१९ विषाणूच्या जागतिक प्रादुर्भावाच्या काळात याच धाडसाने संपूर्ण जगातील परिचारिकांनी जिवाची बाजी लावून मृत्युशय्येवरील अनेक रुग्णांना आपल्या रुग्णसेवेने बरे करण्यात यश मिळविले.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी युद्धभूमीवरील जखमी सैनिकांची रुग्णसेवा करून नर्सिंग क्षेत्रात एक महत्त्वाचे योगदान दिले आहे. आज त्यांचाच हा रुग्णसेवेचा वसा पुढे चालवत जगभरातील परिचारिकांनी कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या युद्धभूमीवर विषाणुबाधित रुग्णांची केलेली सेवा हा एक परिचर्या क्षेत्रातील मैलाचा दगड ठरतो.
खरोखरच आज कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयाची सहायक अधिसेविका या नात्याने हा लेख लिहिताना आनंद वाटत आहे. कारण पँडेमिक काळात नर्सेसने केलेल्या कामाची दखल जगभरात घेण्यात आली याचे आणि फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी परिचर्या क्षेत्रात केलेल्या कार्याचे स्मरण ठेवून नर्सेस याच पद्धतीने काम करीत राहून जनसामान्यांच्या मनावर ठसा उमटवत राहतील, अशी ग्वाही द्यावीशी वाटली म्हणून हा लिहिण्याचा प्रपंच.
परिचारिका दिनानिमित्त जगभरातील परिचारिकांचे मनापासून अभिनंदन आणि त्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या कंदिलाप्रमाणे प्रकाशित राहून अखंडित आरोग्यसेवा देत राहो ही शुभेच्छा.
(लेखिका मुंबई येथील अल्ब्लेस रुग्णालय कामामध्ये सहायक अधिसेविका आहेत.)