संप्रदायाचा वैश्विक आविष्कार

नरेंद्र मोदी यांचे भाषण एका प्रगल्भ वारकरी संप्रदायाच्या नेतृत्वाचेच नव्हे, तर संतांच्या विचारदर्शकांच्या तत्त्वज्ञानाच्या शृंखलेतील आहे, याची साक्ष या कार्यक्रमामुळे पटली… हा कार्यक्रम वारकरी संप्रदायाच्या भौतिक उंचीचा आविष्कार ठरवणारा मानला जाईल.

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे विश्ववंदनीय आहे, म्हणून ते वैश्विक उंचीचे आहे; परंतु या बहुतेक जगामध्ये ते थेट तत्त्वज्ञानाच्या विचारांपासून ते पर्यटकीत सुसंधीपर्यंत या संप्रदायात मला एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूगावातील संत तुकोबाराय शिळा न्यासाच्या उद्घाटनाचे आध्यात्मिक महत्त्व मोठे असले तरी आज या कार्यक्रमातील उपस्थिती आणि त्यांच्या भाषणाने त्यांनी वारकरी संप्रदायाला कमालीची भौतिक उंची प्राप्त करून दिली आहे, असे म्हणावे लागेल. आध्यात्मिक पातळीवर विश्ववंदनीय असलेल्या या सांप्रदायिक तत्त्वज्ञानाला भौतिक जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसाराची आणि त्याकरिता येथील तत्त्वज्ञानाच्या प्रचाराची आवश्यकता आहे.

हा प्रचार तत्त्वज्ञानाच्या बैठकीपासून ते पर्यटनाच्या संधीपर्यंत सर्व स्तरातून होण्याची गरज आहे. भारतीय तीर्थक्षेत्राच्या यादीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुकोबारायांचे वैराग्य सांगत असताना पंढरपूर, देहू, आळंदी या संप्रदायाच्या तीर्थक्षेत्रांना अयोध्या, काशी, चारोधाम, अमरनाथ यांच्या रांगेमध्ये नेऊन बसवले आणि या तीर्थस्थानासह या संप्रदायाला एक वैश्विक उंची प्राप्त करून देण्याचा अत्यंत सकारात्मक प्रयत्न केला, ही मोदी यांच्या आजच्या भेटीची उपलब्धी म्हणावी लागेल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तोंडी असणार्‍या तुकोबारायांच्या अभंगापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचास्थळे विकासापर्यंत सारे काही आध्यात्मिक आणि सामाजिक बिंदू जोडत असताना या संपूर्ण प्रवासात वारकरी संप्रदायाला त्यांनी मध्यबिंदू म्हणून गणले. भक्ती-शक्तीचे प्रतीक असलेली आध्यात्मिकता त्याने भारतीय सांस्कृतिक आणि वैभवाचा महामार्ग प्रशस्त करणारी ठरवली.

हा विचार मांडत असताना त्यांनी केवळ आध्यात्मिक आशावाद दाखवला नाही तर याला राष्ट्रीय विकास अशी झालरदेखील मिळवून दिली. साडेतीनशे किलोमीटरचा पालखी महामार्ग त्यावर होणार्‍या अकराशे कोटी रुपयांचा खर्च आणि या सार्‍या विकासप्रक्रियेमध्ये अमृतमहोत्सवाच्या अवचिततेशी त्यांनी जोडून घेतले.

वारकरी संप्रदायाची अनन्य भक्ती आणि श्रद्धा असलेल्या तुकाराम गाथेतील पदांसह अभंगावरदेखील त्यांनी मुक्तपणे संवाद साधला आणि वारकरी संप्रदायाची शक्तीकेंद्रे जागृत केली. विठ्ठलाच्या आणि पंढरपूरच्या उल्लेख करीत असताना त्यांनी तब्बल पाच वेळा त्या तीर्थस्थानांचा उल्लेख करीत त्याला अनन्यसाधारण महत्त्व आणून दिले. त्यांचे हे भाषण या भारताची सांस्कृतिक विरासत पुढे घेऊन जाणारा एक योग्य आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ठ्या या देशाला मिळाल्याचे समाधान देणारा आहे.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले असे सांगत संपूर्ण जाती-धर्माला एकत्रित करीत भेदाभेद अमंगळ आणि त्यावर असलेली आपली श्रद्धा उद्धृत करीत त्यांनी देशाच्या विचारसरणीला या वारकरी संप्रदायाशी जोडण्याचा प्रयत्न केला. अत्यंत प्रगल्भ, औचित्यपूर्ण परंपरा आणि संस्कृतीचा सन्मान ठेवत त्याला भौतिक विकासाशी जोडणारे हे भाषण नरेंद्र मोदी यांच्या बुद्धीच्या कर्तृत्वाचा अत्युच्च परिपाक मानला गेला पाहिजे.

या भाषणामध्ये काय नव्हते, वारकरी संप्रदायाच्या श्रीमंतीचा आणि वैभवाचा परामर्श जसा होता, तसा तुकोबारायांचा त्याग आणि वैराग्याची साक्षदेखील होती. दया आणि करुणेने असे होते तसे संताजी महाराजांच्या काही प्रमाणात दुर्लक्षित, परंतु वंदनीय अशा संतविभूतींचा उल्लेखदेखील होता. भक्ती, ज्ञान याची आधारशिला म्हणून हे शिळा मंदिर उभारण्याचा उल्लेख त्यांनी केला.
अनेकांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी यांचे भाषण एका प्रगल्भ वारकरी संप्रदायाच्या नेतृत्वाचेच नव्हे, तर संतांच्या विचारदर्शकांच्या तत्त्वज्ञानाच्या शृंखलेतील आहे, याची साक्ष या कार्यक्रमामुळे पटली… हा कार्यक्रम वारकरी संप्रदायाच्या भौतिक उंचीचा आविष्कार ठरवणारा मानला जाईल.

Sumitra nalawade: