पुणे | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पारगाव येथे दररोज छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आरतीचा शुभारंभ केला जातो. इतकेच नाही तर गावातील प्रत्येक कुटुंबही यात सहभागी होतात. ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहेत.
1985 सालापासून लोक वर्गणीतून पारगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्यावेळी गावातून 51 हजार रुपये वर्गणी गोळा करून हा पुतळा उभारण्यात आला होता. गावातील प्रत्येक सण कार्याला तसेच निवडणूक प्रचाराचा शुभारंभ, तुकाई देवी यात्रेचा छबिण्याचा शुभारंभ, कोणत्याही आंदोलनाचा शुभारंभ या पुतळ्याला नतमस्तक होऊन हार घालून पुढील कार्यक्रम केला जातो.
वर्षातील 365 दिवस विद्यार्थी व ग्रामस्थ सायंकाळी आठ वाजता पुतळ्यासमोर जमा होतात. पारंपारिक वाद्याच्या गजरात नित्यनियमाने छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होते. यावेळी गावातील प्रत्येक माणूस आहे त्या ठिकाणाहून किंवा आपल्या घरातून या आरतीमध्ये सहभागी होतो. यात आणखी एक विशेष म्हणजे छत्रपतींच्या पुतळ्याला दररोज हार देण्याचे काम प्रसाद ताकवणे हा युवक नित्य नियमाने करतो. दौंड तालुक्यातील या गावाचा उपक्रम सर्वांना प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारा आहे.