नवी दिल्ली – Safadarjang Hospital : मंगळवारी सकाळी दिल्ली मधील सफदरजंग रुग्णालयाच्या इमारतीबाहेर एका महिलेला आपल्या बाळाला जन्म द्यावा लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाकडून गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे रुग्णालयाच्या बाहेरच महिलेची प्रसूती करावी लागली. महिला आणि तिचे बाळ दोघे सुखरूप आहेत.
संबंधित एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. दरम्यान, घटनेच्या काही तासानंतर दिल्ली महिला आयोगाने (DCW) सफदरजंग रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. ‘माता झालेली महिला अगोदरच्या सायंकाळी नियमित तपासणीसाठी सफदरजंग रुग्णालयात आली होती. आज सकाळी महिलेला त्रास होत असल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांकडून महिलेची प्रसूती करण्यात आली’ असं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
समोर आलेल्या व्हिडीओ मध्ये काही महिला गरोदर महिलेची रुग्णालयाच्या बाहेर प्रसूती करत असल्याचं भयानक चित्र दिसत आहे. रात्रभर महिलेच्या कुटुंबियांकडून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मागणी केली जात होती मात्र रुग्णालय प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे व्हिडीओ मध्ये एका महिलेने सांगितले आहे.
व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली. सफदरजंग रुग्णालयाला दिलेल्या नोटीसमध्ये, आयोगाने रुग्णालयाला घटनाक्रम आणि या प्रकरणाचा चौकशी अहवाल देण्यास सांगितले आहे. कमिशनने महिलेची गंभीर वैद्यकीय स्थिती असूनही तिला कथितपणे प्रवेश नाकारल्याची कारणे मागितली आहेत.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला त्या म्हणाल्या, “नामांकित सरकारी रुग्णालये देखील अशा प्रकारे गंभीर रुग्णांना दाखल आणि उपचार नाकारतात, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील सामान्य लोकांच्या विश्वासाला तडा देतात. मी सफदरजंग रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले आहे. सदर घटना लज्जास्पद आहे आणि निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई सुनिश्चित करण्यासाठी आणि परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीची पावले उचलली गेली पाहिजेत जेणेकरून त्याची पुनरावृत्ती होणार नाही.”