औरंगाबाद : शहरातील शिवाजीनगर भागात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेने एकादशीच्या दिवशीच मृत्यू हवा म्हणून चक्क अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील सर्वजण झोपल्यानंतर रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. कावेरी भास्कर भोसले (वय 80) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी भोसले यांना आध्यात्माची प्रचंड आवड होती. त्याचबरोबर एकादशीला मृत्यू यावा, अशी त्यांची भावना होती. याबाबत त्यांनी अनेकदा कुटुंबातील सदस्यांना बोलून दाखवली होती. दरम्यान रविवारी कामिका एकादशी होती. त्यामुळे कावेरी भोसले यांनी रात्री 10 वाजेच्या सुमारास भजन केले.
रात्री कुटुंबातील सार्वजन झोपल्यानंतर कावेरी या वरच्या मजल्यावर गेल्या आणि अंगाला गावरान तूप लावले. त्यानंतर स्वतःला पेटवून घेतले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना काही दिवसांपासून आजार देखील होते. आजारालाही त्या कंटाळलेल्या होत्या असं सांगण्यात येत आहे.