वस्तीवर जाण्यासाठी महिलांनी केली रस्त्याची मागणी

लोणी धामणी : लोणी (ता. आंबेगाव) येथील गलठा वस्तीमधील रहिवाशांना वस्तीवर जाण्यासाठी येण्यासाठी गेली कित्येक वर्षे झाली रस्ता नाही. यासाठी येथील महिलांनी रस्त्याची लेखी मागणी केली आहे. बेल्हा-जेजुरी राज्य महामार्गालगत लोणीच्या दक्षिणेला गलठा वस्ती असून, रस्त्यापासून वस्तीपर्यंत साधारण एक किलोमीटर लांबीचा रस्ता आवश्यक आहे. थोडा रस्ता काही अंतरापर्यंत ग्रामपंचायतीने रस्त्याचे काम केले आहे. पुढे काही घरांची व शेतीची मोठी अडचण आहे. त्यामुळे रहिवाशांना जाण्यायेण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. वस्तीवरील नागरिकांना इतरांच्या शेतातून किंवा घराच्या अंगणातून कसेबसे जावे लागते.

वस्तीवरील शेतकर्‍यांना व रहिवाशांना शेतीमाल, दूध व जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. वस्तीवरील महिलांनी व रहिवाशांनी रस्ता मागणीचे निवेदन ग्रामविकास अधिकारी सोनाली जाधव यांच्याकडे दिले आहे. याबाबत बोलताना माजी उपसरपंच शिवाजीराव गायकवाड म्हणाले की, रस्त्यासाठी रहिवासी बरेच दिवस प्रयत्न करीत आहेत. पण रस्ता काही झाला नाही. यासंदर्भात लवकरच येथील नागरिक तहसील कार्यालय घोडेगाव येथे उपोषणाला बसणार आहेत. त्याबाबत लेखी निवेदनाची प्रत तालुकास्तरावरील सर्व अधिकार्‍यांना पाठवली आहे. लवकरात लवकर रस्त्याचे काम मार्गी लावावे, असे आवाहन माजी उपसरपंच राजेंद्र गायकवाड व येथील महिलांनी केले आहे. ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गायकवाड यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना भेटून रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावू असे म्हणाले. घरापर्यंत कुठले वाहन जात नाही. वाहन दूर ठेवूनच जावे लागते. महिलांचे व लहान मुलांचे तर फार हाल होत आहेत. रस्ता लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विशेषतः महिलांनी केली. तसे निवेदन महिला ग्रामस्थ कमल, सुरेखा, आशा, मीना, मंगल, इंदूबाई, कलाबाई, मंगल गायकवाड यांनी ग्रामपंचायतीला दिले आहे.

Sumitra nalawade: