बुधवार पेठ मेट्रो स्थानकावर ब्रेक थ्रू
पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गाच्या बोगद्याच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. टीबीएम मुळा-२ ने बुधवार पेठ मेट्रो स्थानकावर ब्रेक थ्रू करण्यात शनिवारी यश मिळवले आहे. दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी स्वारगेटपासून सुरू झालेले खोदकाम मंडई स्थानक ओलांडून बुधवार पेठ येथे २.०२५ किमी बोगदा तयार करून अंदाजे १० महिन्यांत बाहेर आले आहे. पुणे मेट्रोने गाठलेला हा टप्पा म्हणजे एकूण १२ किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
भूमिगत विभाग सुमारे ६ किमी आहे आणि या भागामध्ये शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई व स्वारगेट भूमिगत मेट्रोस्थानके आहेत. भूमिगत विभागात अप व डाऊन मेट्रोट्रेनसाठी दोन समांतर बोगद्यांचा समावेश आहे. ६ किमी बोगद्याच्या कामासाठी तीन टीबीएम वापरण्यात आले. या टनेल बोअरिंग मशिन्सना पुण्यातील नद्यांची मुळा, मुठा आणि पवना ही नावे देण्यात आली आहेत. जेव्हा टीबीएम बोगद्याचे काम पूर्ण करते आणि स्टेशन शाफ्टवर येते, तेव्हा या घटनेला ब्रेक थ्रू असे संबोधले जाते. सध्याची घटना म्हणजे पुणे मेट्रोचे शेवटचे ब्रेक थ्रू आहे. यापूर्वी ५ ब्रेक थ्रू झाले होते.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, पुणे मेट्रोच्या बोगद्याचे काम अत्यंत अचूक आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने करण्यात आले. ही अंतिम प्रगती १२ किमी बोगदा मार्ग पूर्ण झाल्याची खूण असून, महामेट्रोसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. पुण्यातील नागरिक आणि प्रशासकीय संस्थांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत मार्गाचे काम वेगाने आणि यशस्वीपणे पूर्ण झाले नसते. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.