पुणे : ‘विश्वराज’ पुणे येथे उभारण्यात आलेला सर्वात मोठा विश्वशांतीचा घुमट लवकरच जागतिक दर्जाचे आध्यात्मिक केंद्र बनेल. इथला विश्वशांती आणि मानवी कल्याणाचा संदेश जगभर पसरेल व जागतिक वारसास्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास बिहारचे कायदा व साखर उद्योगमंत्री प्रमोद कुमार यांनी व्यक्त केला. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वरमहाराज आणि जगदगुरू तुकाराममहाराज यांच्या नावाने विश्वराजबाग लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील मोठ्या विश्वशांती घुमटाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी प्रमोद कुमार यांच्या पत्नी सुषमा देवी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, विख्यात शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा व एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव महेश चोपडे हे उपस्थित होते. प्रमोद कुमार यांनी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा सत्कार केला.
यावेळी प्रमोद कुमार म्हणाले, डॉ. कराड विश्वशांतीच्या दिशेने कार्य करीत आहेत. महात्मा गांधींनी घालून दिलेल्या शांती आणि सद्भावनेचा वारसा डॉ. कराड चालवित आहेत. भविष्यात युवावर्गाला भारत कसा आणि कुणामुळे विश्वगुरू बनला, याचे ज्ञान या वास्तूमुळे मिळेल. विश्वशांतीचा विशाल घुमट हा ९ वे आश्चर्य म्हणून उदयास येईल, असा विश्वासदेखील त्यांनी या वेळी व्यक्त केला.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, विश्वशांतीचा घुमट या वास्तूतून दिला जाणारा मानवता, विश्वकल्याण आणि विश्वबंधुत्वाचा संदेश महत्त्वाचा आहे. या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञाची ५४ पुतळे स्थापित केले आहेत. अशा प्रकारची वास्तू ही मानवी इतिहासात प्रथमच साकार झाली आहे.