कोल्हापूर | Nana Patekar Offer To Minister Hasan Mushrif – प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी उत्कृष्ट आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच त्यांनी अनेक हीट चित्रपट दिले आहेत. नुकतंच नाना पाटेकर यांनी कोल्हापूरच्या कागल येथे चार महापुरूषांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यादरम्यान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकरांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना थेट ऑफरच दिली आहे.
या कार्यक्रमासाठी नाना पाटेकर यांचा मुक्काम जवळच्या एका हॅाटेलमध्ये करण्यात आला होता. हसन मुश्रीफांना यासंदर्भातली माहिती समजताच ते स्वत: नाना पाटेकर यांच्याकडे गेले. त्यांनी नानांचे खास पद्धतीने स्वागतही केले. तसंच मुश्रीफ हे भेटायला येत असल्याचे समजताच नाना देखील खोलीच्या बाहेर येऊन उभे राहीले. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांची गळाभेट घेतली.
यावेळी नाना पाटेकर मुश्रीफ यांना म्हणाले, ‘अरे तू इकडे कशाला आलास? मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो’. त्यावर उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, ‘असं कसं? पाहुण्यांचे स्वागत,आदरातिथ्य करणं हे आम्हा कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत’. यावेळी नाना पाटेकर यांनी हसन मुश्रीफ यांचा एकेरी केलेला उल्लेख पाहून सर्वजण चकित झाले होते.
यावर नाना म्हणाले, “हसन हा माझा जवळचा दोस्त आहे रे. उगाच गैरसमज करून घेऊ नका. काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्याने जात असलेला हसन मला दिसला. मी ‘हसन..हसन असे म्हणत निघालो. या घाईत माझी गाडी दुसऱ्याला धडकली होती”, असा एक किस्साही नानांनी सांगितला.
दरम्यान महात्मा फुले, आण्णाभाऊ साठे, डॅा. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भाषण देताना नाना पाटेकर म्हणाले, ‘फक्त महापुरुषांचे पुतळे उभारून चालणार नाही. त्यांच्या विचाराने जाण्याची गरज आहे.’
“गेल्या २५ वर्षांपासून मुश्रीफ निवडून येतात ही साधी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकीत ते उभे आहेत असे म्हटलं तर लोक निवडून देतील. पण सत्ताधाऱ्यांनी आमच्यासारख्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत, असंही नाना पाटेकर म्हणाले. इतक्यावरच न थांबता नाना पाटेकर यांनी मुश्रीफ यांना थेट अभिनय क्षेत्रात येण्यासाठी ऑफर दिली. तुम्ही अभिनय क्षेत्रात या, मी राजकारणात येतो”; असं देखील नाना पाटेकर यावेळी म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.