“…तर गणेश मंडळांजवळ तेंडुलकर भिकपेटी लावण्यात येईल”, सचिन तेंडुलकरला बच्चू कडूंचा इशारा

मुंबई | Bacchu Kadu On Sachin Tendulkar – प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात आक्रमक झाले आहेत. सचिन तेंडुलकरनं ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्यामुळे बच्चू कडूंनी त्याच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. सचिननं जुगाराची प्रसिद्धी करणारी जाहिरात सोडावी नाहीतर त्यानं भारतरत्न परत करावा, अशी मागणी कडूंनी केली आहे.

बच्चू कडूंनी आक्रमक होत आज (31 ऑगस्ट) सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, आम्ही भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वारंवार Paytm First जुगाराची जाहीरात बंद करण्याची विनंती केली होती. पण अजूनही ही जाहीरात बंद झालेली नाहीये. तेंडुलकरांना आमचा विरोध नाहीये पण भारतरत्न व्यक्तीस ही बाब अशोभनीय आहे. त्यामुळे त्यांनी ही जाहीरात बंद करावी नाहीतर त्यांनी भारतरत्न परत करावा.

जर सचिननं यापैकी काही केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बस स्टॉप आणि गणेश मंडळांजवळ तेंडुलकर भिकपेटी, तेंडुलकर सुचना पेटी लावण्यात येईल, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. तसंच तुम्ही जर ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करत आहात तर मग मटक्याची देखील करा. ते तरी कशाला सोडताय? तुम्ही भारतरत्न असल्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत, असं बच्चू कडू म्हणाले.

सचिन तेंडुलकरचे मोठ्या संख्येत चाहते आहेत. त्यामुळे त्यानं केलेल्या जाहीरातीचा परिणाम लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकावर होत आहे. त्यामुळे त्यानं ही जाहीरात करणं बंद करावं, असंही कडू म्हणाले.

admin: