मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रशिया-युक्रेन युद्धामुळे तयार झालेल्या परिस्थीतीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी मोदीं सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. अमेरिकेनं भारतावर दबाव आणला तेव्हा भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून सांगितलं आहे की आम्हाला भारताचं हित पाहायचं आहे, अमेरिकेचं हित पाहायचं नाही,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते मंगळवारी पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जगाच्या पाठीवर युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू असताना अमेरिकेने दबाव आणला. तेव्हा अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून भारताचे परराष्ट्रमंत्री सांगतात की आम्हाला भारताचं हित पाहायचं आहे, अमेरिकेचं हित पाहायचं नाही. त्याचवेळी मोदींच्या नेतृत्वात रशियाला देखील असं वाटतं की रशिया आणि युक्रेनमध्ये कोणी मध्यस्थी करू शकत असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात.”
“भारतात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत एक परिवर्तन मोदींनी सुरू केलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादाचा शाश्वत विचार या दोन गोष्टींवर हा भारत पुढे जाईल. भारत विश्वगुरू झाला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. आपल्याला विश्वावर राज्य करायचा नाही, तर विश्वाला विचार द्यायचा आहे. तो विचार देणारा भारत निश्चितपणे तयार होऊ शकेल. त्यासाठी भाजपा हे उपकरण असेल,” असंही फडणवीस म्हणाले.