नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगबादमध्ये घेतलेल्या सभेत बोलताना पुन्हा एकदा भोंग्यासंबंधी दिलेल्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केला आहे. ईदनंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणा असा आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. तसंच त्यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला होता. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते नाशिक मधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंनी काल पूर्वीचंच भाषण रिपीट केलंय. भोंग्याबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही. राज्य घटना, कायदे, नियम सर्वांना सारखे आहेत. त्यामुळं घरी बसून आणि सभेत बोलायला काय जातं? कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस कारवाई करतील, असा थेट इशारा अजित पवारांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
ते पुढं म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम महात्मा फुलेंनी केलंय, त्यामुळं इतिहास नीट अभ्यासला जावा, असा सल्लाही त्यांनी राज यांना दिला आहे. राज यांनी उन्हाचा तडाखा, भारनियमन, महागाई, कोळशाचा तुटवडा या प्रश्नांबद्दल बोलावं, असा सल्ला देखील पवारांनी दिला आहे.