‘लोका सांगे ब्रम्हज्ञान…’; किशोरी पेंडणेकरांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढी पाडवा मेळाव्यापासून राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये मग ते त्यांचं मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन असो किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साधलेला निशाणा असो. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेवर राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून भाजपाची बी टीम अशी देखील टीका केली जाऊ लागली आहे. यादरम्यान आता शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी राज्यात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा असं आवाहन केलं होतं. मात्र, फक्त बाळा नांदगावकर वगळता खुद्द राज ठाकरेंप्रमाणेच मनसेचे इतरही अनेक नेते चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गेले नसल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि मनसेवर खोचक निशाणा साधला आहे.

यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’… त्यांच्यावर जास्त लक्ष न देता त्यांना वेळ आली की आम्ही उत्तर देऊ. सध्या त्यांना टीका करण्यासाठी भरपूर रिकामा वेळ मिळतोय”.

“विरोधकांकडे टीका करणं हेच शस्त्र आहे. त्यांना त्यांचं करत राहू देत. स्वत: आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचे इतर नेते आपापल्या परीने काम करत आहेत.” असंही पेडणेकर म्हणाल्या.

Sumitra nalawade: