पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात मेंदूविकार तज्ज्ञच (न्यूरॉलॉजिस्ट) नाहीत. त्यामुळे संबंधित रुग्ण आणि दिव्यांग यांचे हाल होत आहेत. आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने ससूनच्या वरिष्ठांना जाब विचारल्यावर, लवकरच न्यूरॉलॉजिस्ट नेमण्याचे आश्वासन देण्यात आले. ससून रुग्णालयात न्यूरॉलॉजिस्ट नाहीत, याला प्रशासनाची अनास्था कारणीभूत आहे, असा आरोप आपने केला आहे.
ससून रुग्णालयात न्यूरॉलॉजिस्ट नसल्याने वैद्यकीय मंडळाच्या दाखल्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय गाठावे लागते. ही बाब आपचे बिबवेवाडी समन्वयक घनःश्याम मारणे आणि कुमार धोंगडे यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे यांच्या लक्षात आणून दिली. सरकारी कर्मचाऱ्याला वैद्यकीय मंडळाचा दाखला अनिवार्य असतो. त्याला रजा व वेतन अदा केले जात नाही. हा दाखला घेण्यासाठी सध्या मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात जावे लागत आहे. दिव्यांग सेवकांचे त्यामुळे अपार हाल होतात.