अर्धशतक उलटून गेलं तरी कम्युनिस्ट नेते, मुंबईतील परळचे माजी आमदार कृष्णा देसाईच्या हत्येचे (१९७०) भूत शिवसेनेच्या मानगुटीवरून काही केल्या उतरत नाही. एका पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांनी श्रीमती सरोजिनी कृष्णा देसाई यांना पराभूत केले होते. शिवसेनेत काही मोठी घडामोड झाली, की देसाई हत्येचा मुद्दा चर्चेत येतोच. यावेळीही तो आलाच…
परामर्श | विनोद देशमुख | ज्येष्ठ लेखक
शहीद कृष्णा देसाईच्या हत्येत शिवसेनेतील वरिष्ठांचा हात होता, असा संशय पुन्हा व्यक्त झाला आहे. नीरा आडारकर आणि मीना मेननलिखित कथा मुंबईच्या गिरणगावाची या पुस्तकातही देसाईचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. पण त्याचवेळी, देसाई स्वत: कसा होता, हे उघड करणारा पुरावाही समोर आला आहे आणि हा पुरावा देणार्या व्यक्ती कोणीही नाही. आकाशवाणीत अधिकारी राहिलेले, संग्रहालयाचे क्युटरपद भूषविलेले, मराठीतील सुप्रसिद्ध विज्ञानकथालेखक असलेले मान्यवर आहेत. त्यांचे नाव आहे- निरंजन घाटे! पुण्याचे निरंजन घाटे. ते स्वत: आणि त्यांचे कुटुंब देसाई भुक्तभोगी आहे.
वरील पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी पुस्तकाच्या दोनपैकी एका लेखिकेला पत्र लिहून देसाईची पार्श्वभूमी कथन केली आणि पुस्तकातील देसाईच्या उदात्तीकरणावर आक्षेप घेत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात निरंजन घाटे लिहितात-
‘मी नुकतेच कथा मुंबईच्या गिरणगावाची हे पुस्तक वाचले. मी गिरणगावातच वाढलो. या पुस्तकात कृष्णा देसाईचे कारण नसताना उदात्तीकरण करण्यात आले आहे. प्रत्यक्षात तो एक महागुंड होता.
या लेखिकांनी त्या काळातील वृत्तपत्रांचा धांडोळा घेतला असता, तर ही गोष्ट त्यांच्या सहज लक्षात आली असती. मुंबईच्या कामगार चळवळीतील पहिला खून ह्याच माणसाने केला. हे मला ठाऊक असायचे कारणही तसेच आहे. त्याने ज्या व्यक्तीचा खून केला ते होते सिंहेंद्र विनायक घाटे माझे वडील होते!
माझे वडील सिंहेंद्र घाटे हे मोरारजी गोकुळदास गिरणीचे लेबर ऑफिसर होते. त्यावेळी समाजवादी नेते पीटर अल्वारिस यांच्या पत्नी लीला अल्वारिस या त्यांच्या सहायक होत्या. वडिलांना धमक्या येऊ लागल्यामुळे अल्वारिस यांनी घाबरून नोकरी सोडली. शेवटी वडिलांची हत्या झाल्यानंतरच मोरारजी मिलमध्ये साम्यवादी कामगार संघटना स्थापन होऊ शकली. नंतर कृष्णा देसाईची हत्या झाल्यानंतर पोलिस आमच्याकडे चौकशीसाठी आले होते. त्या घटनेच्या वेळी आम्ही लोक कुठे होतो, याची विचारपूस झाली. त्यांना वेगवेगळ्या शहरातील सोळा जणांची चौकशी करायची होती. आमच्याकडे यायचे कारण, वडिलांच्या हत्येचा सूड म्हणून आमच्या कुटुंबानेच तर कृष्णाचा खून केला किंवा करवला नाही ना, याची त्यांना खातरजमा करून घ्यायची होती.
ही माहिती मी दोनपैकी एका लेखिकेला कळविली आहे. पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीत दुरुस्ती करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. मात्र, बच वाचक दुसरी आवृत्ती वाचतीलच, हे सांगता येत नाही. म्हणून हे पत्र लिहित आहे.’ निरंजन घाटे यांनी आणखी काही तपशीलही सांगितला. ते म्हणाले, माझ्या वडिलांवर १३ मार्च १९४९ या दिवशी हल्ला झाला आणि १९ मार्च १९४९ रोजी इस्पितळात त्यांचे निधन झाले.
त्यांच्या हत्येचा आरोप ठेवून कृष्णा देसाईवर खटला चालविण्यात आला. त्यात माझी आई अस्वस्थ मानसिकतेमुळे नीट साक्ष देऊ शकली नाही. तिची साक्ष ग्राह्य धरू नये, ही कृष्णा देसाईची मागणी न्यायालयाने मान्य केली! सोळापैकी सहा साक्षीदारांना तर गायबच करण्यात आले होते. माझ्या वडिलांच्या कारच्या ड्रायव्हरला इतर कामगारांनी सहा महिने गिरणीतच लपवून ठेवले. नंतर तो उत्तर प्रदेशात स्वत:च्या गावी पळून गेला, तो कधीच परतला नाही. इतर साक्षीदारही न्यायालयात हजर झाले नाहीत. शेवटी पुराव्याअभावी कृष्णा देसाई सुटला.
माझे वडील सिंहेंद्र कामगारांमध्ये प्रिय होते. कारण, ते कामगारांना अडी-अडचणीत गिरणी व्यवस्थापनाकडून मदत मिळवून देत किंवा प्रसंगी स्वत:च्या खिशातून मदत देत. त्यामुळे कामगार खूश होते आणि या गिरणीत युनियन स्थापन करणे कम्युनिस्टांना शक्य होत नव्हते. त्याचा राग म्हणून कृष्णा देसाईने माझ्या वडिलांची हत्या केली, असे घाटे यांनी स्पष्ट केले.
वडिलांची हत्या झाली तेव्हा निरंजन घाटे अवघे तीन वर्षांचे, तर त्यांचे मोठे बंधू सहा वर्षांचे होते आणि या कुटुंबाची अक्षरश: वाताहत झाली. (याही परिस्थितीत निरंजन घाटे विज्ञानकथालेखक म्हणून नावारूपास आले, हे विलक्षणच म्हणावे लागेल.) कृष्णा देसाई आणि त्यांच्या भाई लोकांनी किती घृणित कृत्य केले, याची यावरून कल्पना यावी.
याच कृष्णा देसाईची हत्या झाल्यावर कम्युनिस्टांनी लालबाग येथे त्याचा अर्धपुतळा उभारला आणि शिवसेनेच्या मागे कायमचे दुखणे लावून दिले.