मुंबई | Monsoon Updates – सध्या पुणे, सातारा, कोल्हापूरसह राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी देखील शिरलं आहे. याच दरम्यान आजही (12 सप्टेंबर) राज्यातल्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. पुणे विभागातील हवामान खात्याचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. आज पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची परिस्थिती राहील. तसंच पुढचे 2 दिवस पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, आज (12 सप्टेंबर) पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.