‘…त्यामुळे मराठी चित्रपट १०० कोटींच्या घरात जायला वेळ लागणार नाही’- चिन्मय मांडलेकर

मुंबई : सध्या सगळीकडे ‘शेर शिवराज’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडेलकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. तसंच या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसंच नुकतंच चिन्मय मांडेलकरने मराठी चित्रपटांचे मार्केट आणि बजेट यासंदर्भात भाष्य केलं आहे.

शेर शिवराज या चित्रपटाची टीमने नुकतंच पुण्यातील एका रेडिओ चॅनलशी संवाद साधला. यावेळी चिन्मयने मराठी चित्रपट, त्यांचे बजेट यावर भाष्य केलं आहे. त्यासोबतच त्यांने इतर भाषिक चित्रपटांच्या बजेटबद्दलही माहिती दिली. “मराठीचं मार्केट आणि बजेट हे अजूनही कोटींमध्ये नाही. आपल्यालाही वाटतं की बाहुबली, केजीएफ हे चित्रपट बनवावे, पण त्या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च काही शे कोटीत आहे. मराठीत अजून कोटीच्या मागे हा शे शब्द लागायचा आहे. ते शे देखील एक दिवस लागेल. बाब्या खातो दहा लाडू, पण त्याला देतो कोण अशी मराठीची अवस्था आहे. पण हे चित्र नक्की बदलेल. पण तोपर्यंत चांगलं काम करत राहणं, हे तर नक्कीच आपल्या हातात आहे,” असंही चिन्मय मांडलेकरने म्हटलं आहे.

पुढे तो म्हणाला, बाहुबली ५०० कोटी, टायगर जिंदा है किंवा पीके २०० कोटी, पुष्पा ४०० कोटी, आरआरआर आणि केजीएफ ५५० कोटी हे आकडे हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर दिसतात. पण या चित्रपटांचे बजेट काही शे कोटींच्या घरात असते. मराठी चित्रपटांचे आता हे दिवस नसले तरी चित्रपट निर्मितीची कल्पकता आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपट १०० कोटींच्या घरात जायला वेळ लागणार नाही.

Sumitra nalawade: