पुणे | जून महिना आला पण मान्सून अजून सक्रीय झालेला नाही. राज्यात वाढते तापमान आणि त्यामुळे होणारी पाण्याची टंचाई हि समस्या तीव्र होत चालली आहे. पावसाच्या सरी कोसळत नाहीयेत. परिणामी नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस लांबल्याने त्याचे परिणाम दिसायला सुरवात झाली आहे. अशा वेळी अनेक शहरात आणि जिल्यात टँकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा केला जातो त्यातच आता वाढते तापमान आणि पावसाची परिस्थिती पाहता पुण्यात या वर्षी मागच्या वर्षाच्या तुलनेने पाण्याच्या टँकरची मागणी वाढत चालली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्याच्या तीन तालुक्यातील 67 गावं पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. आंबेगाव, जून्नर आणि खेड या तीन तालुक्यातील 67 गावात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलय. या टँकरच्या दिवसाला 136 फेऱ्या होत आहेत. आंबेगाव तालुक्यातील सर्वाधिक 16, खेड 13 आणि जुन्नरमधील 10 गावं वॉटर टँकरवर अवलंबून आहेत.
मान्सूनचा पाऊस लांबल्याने तालुक्यातील विहिरी आणि धरणातील पाणीसाठा आटत चाललाय, त्यामुळे टँकरची मागणी वाढल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मागच्या वर्षी 16 जूनला 59 गावातील 308 खेडेगावात 66 टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. चालू वर्षाशी तुलना करता टँकरची संख्या 44 आहे. पण पाण्याची मागणी करणाऱ्या गावांची संख्या 67 आहे. यंदा पुण्यात मान्सूनच्या आगमनाला 10 दिवसांचा विलंब झालाय. 22 जूनला पुण्यात मान्सूनच्या धारा बरसतील अशी अपेक्षा आहे.