“त्यांनी माझा हात पकडला अन्…”; सुष्मिता सेननं सांगितला महेश भट्ट यांचा ‘तो’ किस्सा

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तसंच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत येत असते. सुष्मितानं काही वर्ष चित्रपटातून ब्रेक घेतल्यानंतर ‘आर्या’ या वेब सीरिजमधून कमबॅक केलं आहे. तिची ही वेब सीरिज चांगलीच गाजली आहे. तसंच नुकतीच सुष्मिता सेननं ट्विंकल खन्नाच्या टॉकशोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिनं करिअर आणि खासगी आयुष्यावर भाष्य केलं आहे. या शोमध्ये तिने महेश भट्ट यांच्यावर भडकल्याचा एक किस्सा देखील शेअर केला आहे.

सुष्मिता सेननं ट्विंकल खन्नाचा युट्यूब शो ‘ट्विक’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सुष्मितानं सांगितलं की, जेव्हा ती मिस युनिव्हर्सचा मुकूट जिंकून भारतात परतली होती तेव्हा तिला दिग्दर्शक महेश भट्ट यांचा कॉल आला होता. सुष्मिता सेन म्हणाली, “महेश भट्ट यांनी मला कॉल करून विचारलं होतं की माझ्या आगामी चित्रपटाची अभिनेत्री होशील का? त्यावर मी त्यांना सांगितलं मला अभिनय येत नाही ना मी अभिनयाचे धडे घेतले आहेत. तर ते म्हणाले मी तुला अभिनेत्री म्हटलेलंच नाही.”

पुढे सुष्मिता म्हणाली, “महेश भट्ट यांनी मला विश्वास दिला की मी हे करू शकते, तेव्हा मी चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. त्यादिवशी माझा एक सीन होता ज्यात संताप दाखवायचा होता. पण हा सीन देणं मला काही केल्या जमत नव्हतं. शेवटी महेश भट्ट मला म्हणाले अरे कुठून आली आहेस तू , तुला काहीच येत नाही. त्यांच्या बोलण्याचा मला खूप राग आला. मी रागात स्वतःचे इअरिंग्स फेकून दिले आणि तिथून निघून जात होते. एवढ्यात महेश भट्ट यांनी माझा हात पकडला आणि मला म्हणाले, हाच राग मला त्या सीनमध्ये हवा आहे. मला राग देण्यासाठी त्यांनी ही युक्ती केली होती.”

दरम्यान, सुष्मिता सेननं महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ चित्रपटातून आपल्या बाॅलिवूड करिअरची सुरवात केली होती. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या ती वेब सीरिज ‘आर्या’च्या आगामी सीझनची तयारी करत आहे. 

Sumitra nalawade: