भविष्यात आढळरावच संसदेत असतील

बेबनावावर भाष्य टाळले
जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बेबनाव असल्याचा प्रश्न उपस्थित केला असता राऊत यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले. याबाबत तुम्ही संपर्कप्रमुख अथवा जिल्हाप्रमुख यांना विचारा, असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकली व याविषयी अधिक बोलणे टाळले.

मंचर : राष्ट्रीय स्तरावरच्या सर्व निवडणुका एकत्रित लढविण्यावर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कामाची नोंद इतिहासात झाली आहे. भविष्यात आढळराव-पाटील संसदेत असतील हे मात्र नक्की, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. लांडेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला. राऊत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचे संकेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिले आहेत.

महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. राज्यातील सरकार टिकणार नाही असे सांगत हे सरकार पडावे यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले होते. सरकार जाणार्‍यांसाठी तारखांवर तारखा देत होते. आता शेवटची तारीख १ जून दिली आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल, असे सांगून राऊत म्हणाले, आमच्यावर सूडभावनेने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय. महाराष्ट्रावर वैर आहे या भावनेतून कारवाई केली जाते.

सुडापोटी ही कारवाई होत असून, महाराष्ट्राला केंद्राकडून सहकार्य मिळत नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता बीजेपीला नको आहे. महाविकास आघाडीवर संकटांवर संकटे येत असतानाही ती ताकदीने उभी आहे. राष्ट्रीय स्तरावरील निवडणुका एकत्रित लढविण्यावर महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे सर्व निवडणुका एकत्रित लढवल्या जातील. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठीमागे शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत. आढळराव यांच्या कामाची नोंद इतिहासात झाली आहे.

भविष्यात आढळराव-पाटील नक्कीच संसदेत असतील, असे सांगून ते म्हणाले, राज्यात आघाडीत बिघाडी झाल्याचा आरोप काहीजण करतात. मात्र युतीच्या काळातही अशीच परिस्थिती होती. दोन-तीन पक्षांचे सरकार सत्तेत असते त्यावेळी असे प्रकार घडत असतात. मात्र एकत्र बसून निर्णय घ्यायचे असतात. त्यातून मार्ग निघतो. आमदार रोहित पवार हे अयोध्या दौर्‍यावर आहेत ही चांगली गोष्ट आहे. भविष्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व आम्ही सगळे अयोध्येला जाणार असून, तेथे आताच स्वागताचे फलक लागले आहेत.

अयोध्या हा श्रद्धेचा विषय आहे. तिथे प्रत्येकाने जायला पाहिजे. शिवसेनेला आयोध्या नवीन नाही. राज ठाकरे हेसुद्धा अयोध्याला जाणार आहेत असे विचारले असता ठाकरे यांनी आतापर्यंत कोणता मुद्दा उचलला तो संशोधनाचा विषय आहे.असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन वापरण्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आगामी निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे ही देशाची मागणी आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मी क्रिकेटची मॅच पाहत नाही अगदी टीव्हीवर सुद्धा कधी मॅच पाहिली नाही. मात्र बॅटिंग, बॉलिंग सगळे करतो. असे सांगून ते म्हणाले आढळराव पाटील यांनी आमंत्रण दिल्यावरून येथे आलो आहे.

बॉलिंग, बॅटिंग ,पंचगिरी, वाईड बॉल सर्व काही करण्याची तयारी आहे. भाजपा व मनसे युती झाल्यास परिणाम होईल का असे विचारले असता कसला परिणाम त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असा टोला त्यांनी लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला कोणाचेही आव्हान नाही. ज्यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना मतदारांनी झिडकारले आहे. असे सांगून पुणे महानगरपालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी सांगितले. १२ आमदारांची यादी राज्यपालांकडून अद्याप मंजूर झालेली नाही. या विषयी बोलताना ते म्हणाले ही लोकशाहीतील घटना नसून दुर्घटना आहे. शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सुरुवातीला स्वागत केले. यावेळी संपर्क प्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Prakash Harale: