मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं होतं. तसंच पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर आज कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी 13 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे त्यांना सेवेत घेता येणार नसल्याची माहिती दिली आहे.
यादरम्यान भाजपचे नेते निलेश राणे यांनी “हे १०९ कामगार मराठी नाही?? कुठेही पवारांच्या घराचं नुकसान झालेलं नाही मग ही शिक्षा कशासाठी??” असा सवाल केला आहे. या १०९ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेता येणार नाही असे सांगितल्यानंतर निलेश राणे यांनी हे कर्मचारी कुठे जातील असा सवाल करत शरद पवार यांच्यावर देखील हल्ला चढवला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे की, “हे 109 कामगार मराठी नाही?? कुठेही पवारांच्या घराचं नुकसान झालेलं नाही मग ही शिक्षा कशासाठी?? किती दिवस पवारांची भांडी घासणार, भानगडी सोडल्या तर काय मिळालं पवारांमुळे महाराष्ट्राला याचा कधी तरी विचार करा आणि ते 109 कामगार कुठे जातील याचाही विचार करा.”