अलिबाग : दोन वर्षे कोरोना महामारीमुळे गणपती उत्सव उत्साहात साजरा करता आला नाही. यंदा मात्र सर्व सण धूमधडाक्यात साजरा होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. कोरोना काळात विस्कटलेला व्यवसाय यंदा पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेश मूर्तिकारांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पेणमधून या वर्षी सुमारे ३२ लाख गणेशमूर्ती देशभरात, तसेच परदेशांत रवाना झाल्या आहेत. आकर्षक रंगसंगती आणि देखणी मूर्ती हे पेणमधील गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे. पेणच्या मूर्तींना महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशांतून मागणी असते. यंदा पेणमधून सुमारे ३२ लाख गणेशमूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.
देश-परदेशांत गणेशमूर्तीची विक्री केली जाते. यातून जवळपास ५० ते ६० कोटींची उलाढाल होते. पेणमधून दर वर्षी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया, मॉरिशस आणि दुबई येथे गणेशमूर्ती मोठ्या संख्येने पाठविल्या जातात. या वर्षी जवळपास ५० हजार गणेशमूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या.
कोरोना महामारीत मागील दोन वर्षांमध्ये व्यवसायाला फटका बसला होता. गणेशमूर्तीच्या उंचीवरील निर्बंधामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी होती. मोठ्या गणेशमूर्तींना उठाव नव्हता. या वर्षी मात्र मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध उठवल्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साह पसरला आहे. पर्यावरणविषयक जागृतीमुळे शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. बाजारात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींपेक्षा यंदा शाडूच्या गणेशमूर्तींना अधिक मागणी आहे.
या वर्षी पेण शहरात तयार झालेल्या ४० टक्के मूर्ती या शाडूच्या आहेत. एक ते दीड फुटाच्या शाडू मूर्तीची अधिक प्रमाणात विक्री होत असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. विस्कळीत व्यवसायाला उभारी मिळाल्याने मूर्तिकारांमध्ये यंदा आनंदाचे वातावरण आहे.