राज्यसभेच्या फडात काहीजण,
आकडेशास्त्र घोळत बसले…
बिचारे दोन कैदी मात्र,
हात चोळत बसले…!!
उद्या मेलडी सिंफनीमध्ये :
जलते हैं जिस के लिए…
संजीव शाळगावकर
विधान परिषदेसाठी निवडणूक जाहीर झाली… उमेदवार जाहीर झाले, अन् भाजपच्या यादीत पंकजाताईंचे नाव नाही हे बघून त्यांचे कार्यकर्ते खवळले.. झाssलं… औरंगाबादमध्ये राडा झाला… कार्यकर्त्यांनी भाजपचं कार्यालय फोडलं… पंकजाताईंवर अन्याय झाल्याची हाकाटी पिटली गेली… संतापाची लाटही पसरली… वास्तविक, कार्यकर्त्यांच्या मनात अन्याय अन् राडा असले काही शब्द नसतात. पण ज्यावेळी नेताच एखाद्या सभेत आपल्याला पक्षापेक्षा मोठं समजू लागतो, तेव्हाच असं वातावरण निर्माण होतं… गेल्या काही दिवसांत पंकजाताईंच्या झालेल्या सभा आणि त्यांची वक्तव्यं तपासली तर या सर्व वास्तवाचं मूळ त्यात आहे…
एकदा तर त्यांनी एकनाथ खडसे यांना बोलावून आपल्यावरील अन्याय त्यांच्या तोंडून वदवला होता… भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता, हे कोणीही मान्य करेल… पण त्या बदल्यात पक्षानं आपल्याला काहीच दिलं नाही, असं म्हणत भुई थोपटण्यात काहीच अर्थ नाही, हे पंकजाताईंना कुणीतरी सांगायला हवं… गोपीनाथजी यांनी पक्षाची उभारणी केली… पक्ष मोठा केला… त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं… ‘युती’च्या रूपानं पक्ष सत्तेवर आला… त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्रिपदही मिळालं… नंतर केंद्रात सत्ता आली, त्यावेळी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपदही मिळालं!
आता मुद्दा उरतो तो गोपीनाथजींच्या पश्चात काय झालं? त्यांच्या पुण्याईवर पंकजाताईंना आमदारकी मिळाली… त्या मंत्री झाल्या… सध्या त्या एमपीच्या प्रभारीदेखील आहेत. गोपीनाथजींच्या दुसर्या मुलीला, प्रीतमताईंना खासदारकी मिळाली…
याव्यतिरिक्त पक्षांतर्गत अनेक पदेही या भगिनींनी उपभोगली… एवढं पक्षानं देऊनसुद्धा त्यांच्या मनात अन्यायाची भावना असेल, तर त्याला कोण काय करणार? विधान परिषदेची उमेदवारी घेऊन एक साधा आमदार होण्यापेक्षा पंकजाताईंना आत्ता केंद्रामध्ये पक्षांतर्गत जे पद आहे, ते आमदारकी पेक्षा कित्येक पटीनं मोठं असावं… पण हे कार्यकर्त्यांना कोण सांगणार? स्वतःच अन्याय झाला म्हणून आरडाओरडा केला की, कार्यकर्ते भडकणार आणि असं काहीतरी हिंसक करून शक्तिप्रदर्शन करणार, हे सर्वच नेत्यांना आता ठाऊक आहे… पंकजाताईंना तर ते नक्कीच माहीत असणार? यापेक्षा पक्षानं घेतलेला निर्णय शांततेनं अन् सबुरीनं घेतला तर आपल्या पदरात खूप काही पडू शकतं… याची गेल्या काही दिवसांत शेकडो उदाहरणे आहेत… पंकजाताईंना ते सांगण्याची आता वेळ आली आहे!