यंदाच्या वर्षी राज्यात होणार ६ दसरा मेळावे; कुणाचा दसरा मेळावा कधी अन् कुठे? जाणून घ्या..

यंदाच्या वर्षी राज्यात होणार ६ दसरा मेळावे

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. यावर्षी राज्यात आपल्याला ६ दसरा मेळावे पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी, राज्यात कोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा, नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा, यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनेचा राजकीय दसरा मेळावा सुरू केला.

मध्यंतरी म्हणजे अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष त्यांच्यासोबत गेला. त्यामुळे, त्यांनीही दसरा मेळाव्याची प्रथा कायम ठेवली असून शिवसेनेचा दुसरा दसरा मेळावा सुरू केला आहे. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भगवान गडावर दसरा मेळावा घेतला जातो.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी तो दसरा मेळावा सुरु केला होता. आता, यंदाच्या वर्षीपासून मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत यंदा बीड जिल्ह्यातील नारायणगडावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

दसऱ्याच्या सणाला मोठी परंपरा असून ती परंपरा जपत आजही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही दसऱ्याच्या दिवशी ६ ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे. आता या मेळाव्यातून कोण काय बोलणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. आता हे मेळावे कधी आणि कुठे पार पडणार हे जाणून घेऊया…

कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा
कोल्हापुरातील शाही दसरा मेळाव्याची महाराष्ट्रभर चर्चा असते. राजगादीचा मान असल्याने या सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाते. छत्रपती शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शाहू महाराजांच्या कुटुंबीयांकडून हा दसरा मेळावा साजरा केला जातो. यंदाही दसऱ्यादिवशी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास हा दसरा सोहळा साजरा होणार आहे.

नागपूरमधील संघाचा दसरा मेळावा
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा यंदाही परंपरेनुसार होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची (आरएसएस) स्थापना सप्टेंबर १९२५ मध्ये केशव बलिराम हेडगेवार यांनी दसऱ्याच्या दिवशीच केली होती. त्यामुळे, संघाच्या स्थापनेपासून येथे दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. १२ ऑक्टोबर रोजी दसऱ्या दिवशी सकाळी १० वाजताच्या सुमारास येथे दसरा मेळावा साजरा केला जाणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा
शिवसेना उबाठा गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून बुधवारी हा टीजर प्रदर्शित करण्यात आला. यात ‘वाजत गाजत, गुलाल उधळत या!’ असे आव्हान शिवसैनिकांना करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे. त्यासाठी आझाद मैदानात सध्या भव्य असे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे.विधानसभा निवडणूक असल्यामुळे शिवसेनेकडून यंदा भव्य शक्ती प्रदर्शन दसरा मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मेळाव्याला सुरुवात होणार आहे.

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा
मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे तब्बल १२ वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या दसरा मेळाव्याची प्रथा सुरू केली होती. पार्थर्डी तालुक्यातील भगवान गडावर पंकजा मुंडे व धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा होणार आहे. दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास हा दसरा मेळावा होणार आहे.

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. बीड जवळील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होणार आहे. मनोज जरांगेंचा दसरा मेळावा दुपारी १ वाजताच्या सुमारास होणार आहे.

Rashtra Sanchar: