‘जे हनुमान चालिसाला विरोध करतात ते बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक नाहीत’- रवी राणा

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी हनुमान चालिसा वाचावी असं आम्हाला वाटतं. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसेचं पठण करावं. बाळासाहेब ठाकरेंवर श्रद्धा असेल तर तुम्ही पठण कराल. शिवसेना हिंदूत्वाची दिशा सोडून दुसऱ्या दिशेने जात आहे, असा खोचक टोला भाजपाचे रवी राणा यांनी लगावला आहे. महाराष्ट्राला साडेसाती लागली आहे, म्हणून हनुमान चालीसा पठण करा, असा सल्ला आम्ही दिला आहे. मात्र हिंदुत्वाची मतं घेऊन ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आता विसर पडलाय, अशी टीका देखील रवी राणा यांनी केली आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

यावेळी रवी राणा म्हणाले, मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी हनुमान जयंती दिनी पठण करावे अशी विनंती केली होती. बाळासाहेब ठाकरे आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचन करावे अशी आमची इच्छा आहे. जे हनुमान चालीसाला विरोध करतात ते बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक नाहीत. उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. त्यांनी विघ्न संपविण्यासाठी हनुमान चालीसा वाचली पाहिजे, असा सल्लाही यावेळी रवी राणा यांनी दिला आहे. काहीही झाले तरी आम्ही मात्र उद्या आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार, असं देखील रवी राणा यांनी म्हटलं आहे.

आम्हाला पोलिसांनी नोटीस दिली आहे. आम्ही गोंधळ करण्यासाठी आलो नाही. महाराष्ट्रावर जे संकट आलं आहे ते दूर व्हावं यासाठी आम्ही हनुमान चालीसा मातोश्रीवर वाचणार आहोत. उद्धव ठाकरे यांना सत्तेचा लोभ आला असून त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. आमचा यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. त्यामुळे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेही राखू शकत नाही असंही रवी राणा म्हणाले आहेत.

Sumitra nalawade: