सातारा | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळी अधिवेशनात देखील विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी याप्रकरणी भिडे यांना अटक करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी अधिवेशनात केली होती.
या घटनेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना रविवारी फोनद्वारे, तसेच मेलद्वारे अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविला. राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य कारवाई करू असे म्हटले होते.