नागपूर | Nitin Gadkari | केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना पुन्हा धमकीचे फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात धमकीचे फोन आले आले असून 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आज (21 मार्च) सकाळी गडकरी यांच्या नागपुरातील खामला येथील जनसंपर्क कार्यालयातील लँडलाईनवर दोन वेळा धमकीचे फोन आले. या कॉलवरून गडकरींकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपूर शहर पोलिसांनी नितीन गडकरींच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
ATS च्या पथकांतर्फे घराची आणि कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावानं ही धमकी देण्यात आली आहे. यापूर्वीही याच व्यक्तीनं नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन केला होता. जयेश कांथा हा हत्येच्या प्रकरणात बेळगाव कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.