मराठवाड्यातील रोज तीन शेतकरी संपवतायत जीवन, आठ महिन्यात ८६५ शेतकऱ्यांची आत्महत्या?

छत्रपती संभाजीनगर | मागील तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचा वेग प्रचंड वाढला असून, गेल्या ८ महिन्यात तब्बल ८६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. म्हणजेच दिवसाकाठी दोन ते ३ शेतकरी आत्महत्या होत आहेत.

धक्कादायक म्हणजे हा शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक समजला जात आहे. तर, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यंमत्रीपदाची शपथ घेतल्यावर सर्वात आधी राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माझा पहिला प्रयत्न असणार असल्याचा दावा केला होता. मात्र, आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्नही निरुपयोगी ठरताना दिसत आहेत. कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मराठवाड्यात गेल्या ८ महिन्यांत म्हणजेच १ जानेवारीपासून ते ३१ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल ६८५ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले. अंगावर शहारे आणणारा हा आकडा शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक असल्याचे बोलले जात आहे.

दररोज तीन शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात मराठवाड्यात १ हजार २२ शेतकरी आत्महत्येची नोंद झाली होती. असे असताना यावर्षी ८ महिन्यातच ६८५ वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच मराठवाड्यातील आत्महत्यांचा हा वेग चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

तीन वर्षांची आकडेवारी…

-१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या काळात मराठवाड्यातील ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
-१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात मराठवाड्यातील ८८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
-१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात मराठवाड्यातील १०२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Sumitra nalawade: