उद्याचे जग संशोधनातून उद्योग निर्मितीचे

कृष्णकुमार गोयल यांचा मुक्त संवाद

पुणे : नवीन शैक्षणिक धोरण हे व्यवसायाभिमुख असून, प्रत्यक्ष उद्योग निर्मिती करणारे संशोधन आणि अभ्यास सातत्य याला या धोरणात महत्त्व आहे, असे सांगून उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी ‘उद्याच्या शिक्षणाची दिशा’ प्रतिपादन केली.
निमित्त होते खडकी शिक्षण संस्थेच्या समन्वयक सभेचे! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ तलाव वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या समिती विद्यमाने शैक्षणिक आणि संशोधन समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. संजय सोनवणे, डॉ. मनीषा वर्मा, डॉ. मोहन वामन, प्रा. डॉ. के. सी. मोहिते, डॉ. वीणा मनचंद आदी मान्यवर होते. पुण्याच्या औद्योगिक आणि शैक्षणिक परिघाला मार्गदर्शन करणारे अनमोल मार्गदर्शन या व्यासपीठावरून झाले.

गोयल यांचे शिक्षण विचार खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असणारे कृष्णकुमार गोयल हे प्रथितयश उद्योजक आहेत, तथापि त्यांनी जे भाषण केले ते एखाद्या संशोधकाला आणि कुलगुरूलाही विचार करायला लावणारे ठरले. त्यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ज्ञान निर्मितीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ज्ञान निर्मिती सातत्याने झाली पाहिजे, अशी आपली दिशा असायला हवी. उद्याचे उद्योग हे माहितीवर नाही तर ज्ञानावर आणि आपल्या संशोधनावर अवलंबून आहे. किंबहुना संशोधक मनोवृत्तीलाच महत्त्व देणारी उद्याची शिक्षण पद्धती आहे, त्यामुळे पुण्याच्या शिक्षण संस्थांनी व विद्यापीठांनी याचा अंगीकार करून वास्तवदर्शी रोजगार देणाऱ्या शिक्षणाची दिशा पकडली पाहिजे.

पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरची शिक्षण पद्धती : पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनीदेखील यावेळी शिक्षणाची दिशा प्रतिपादन करत असताना पुणे विद्यापीठाच्या कामगिरीचा आणि पुढील दिशेचा परामर्ष घेतला. त्यांनी सांगितले की, जगाच्या शिक्षणाबरोबर स्पर्धा करणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करीत असताना पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तराची शिक्षण पद्धती विकसित करू, हे आपले ध्येय आहे. संशोधन करण्यासाठी मुख्यत्वे देशाच्या उन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध गरजांचा अभ्यास करून त्याची पूर्तता करण्यासाठी आविष्कारच्या माध्यमातून संशोधन कार्य झाले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार संशोधनाच्या कार्यालाही दिशा देण्याचे कार्य आपण सर्व एआर सभासदांनी केले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल.’ याचवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मा. राज्यपाल कार्यालय आयोजित आविष्कार ही राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहे.

तीनशे समन्वयकांची उपस्थिती

या समन्वय सभेमध्ये, यामध्ये २६० महाविद्यालयातील ३०० समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय अधीक्षक लक्ष्मण डामसे, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्वाती राजन यांनी आभार मानले.

शैक्षणिक धोरणाला गती

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले आहे. या धोरणाच्या अनुरूप शिक्षणाचे प्रवाह बदलणार आहेत. तथापि हे प्रवाह सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी अशा प्रकारच्या समन्वयकांच्या सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

Prakash Harale: