अमरनाथ यात्रेतील प्रवाशांच्या बाबतीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय…

नवी दिल्ली : कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू पुन्हा सुरू होणार असून, ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान, ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये सर्व यात्रेकरूंना पाच लाखांचा विमा आणि (आरआयएफडी) कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य सचिवांनी दिली आहे. यावेळी शहांनी यात्रेसंदर्भातील नियम आणि व्यवस्थेबाबत जबाबदार अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच आवश्यक सूचना दिल्या.

दरम्यान, अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना सहज दर्शन मिळावे आणि त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, ही मोदी सरकारची प्राथमिकता असल्याचे गृहमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. तसेच यात्रा मार्गावर माहितीच्या प्रसारासाठी मोबाईल टॉवर वाढवणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय अमरनाथ यात्रेकरूंची ये-जा, निवास, वीज, पाणी, दळणवळण आणि आरोग्य यासह सर्व आवश्यक सुविधांसाठी पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचनाही शहा यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रवासाच्या मार्गात कोणत्याही प्रकारची माहिती चांगल्या प्रकारे देण्यासाठी मोबाईल टॉवर वाढवणे, तसेच दरड कोसळल्यास मार्ग तातडीने खुला करण्यासाठी मशीन तैनात कराव्यात अशा महत्त्वाच्या सूचनाही शहा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Prakash Harale: