बाळ झाल्यानंतर त्याच्या संगोपनासाठी महिलांना खूप वेळ द्यावा लागतो. बाळाच्या जन्मानंतर चार-पाच वर्षे त्याची वेळोवेळी काळजी घ्यावी लागते. मात्र उर्वरित वेळेत महिलांना काहीही करता येत नाही. नोकरी वगैरे करण्याचा विचारही महिलांना करता येत नाही. मात्र या प्रश्नावर सुषमा मारकड यांनी अनोखा पर्याय शोधला आहे. त्यांचा प्रवास आपण बघणार आहोत.
सुषमा मारकड यांनी बाळंतपणानंतर दोन वर्षे बाळाची काळजी घेण्याव्यतिरिक्त इतरत्र लक्ष देणे टाळले.
मात्र त्यानंतरच्या दिवसांत काहीतरी काम केलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. पण करणार काय असाही प्रश्न होता. घराबाहेर जाऊन नोकरी तर करू शकत नसल्यानं घरूनच काहीतरी करायला पाहिजे असा विचार त्या करत होत्या. मित्रमैत्रिणींना, पाहुण्यांना विचारपूस केली, मात्र काही सुचत नव्हतं. आयडिया अनेक येत होत्या, मात्र त्या अस्तित्वात आणण्यासाठी अनेक अडथळेही होते.
त्यामुळं अनेक आयडिया त्यांना अस्तित्वात आणता आल्या नाही. काही दिवसांनंतर त्यांच्या मैत्रिणीने अजून एक आयडिया सांगितली. कंपनीकडून होलसेल मध्ये फॅशनचे कपडे वगैरे लोकांकडून ऑर्डर मिळवून त्यांना घरपोच पोहोचवणे. या प्रक्रियेत त्यांना ऑनलाइन काम करायचे होते. कंपनी आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून त्यांना काम करायचे होते. तेही घरूनच आणि ऑनलाइन.
त्याबाबत सुषमा यांनी अधिक माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींचे, परिवारातील लोकांचे whatsapp ग्रुप तयार केले आणि विविध फॅशनच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलं. वेगवेगळ्या ऑफर लोकांपर्यंत पोहोचत असल्यानं लोक ऑर्डर करायला लागले. सुषमा यांचे मित्रमैत्रिणीदेखील परस्पर मित्रांपर्यंत ऑफरच्या माहिती पोहोचवत. त्यामुळं त्यांना अजून ऑर्डर यायला लागल्या.
कंपनीला ग्राहक मिळवून दिल्यानंतर सुषमा यांना प्रत्येक ऑर्डरमागे काही कमिशन मिळत असल्यानं त्यांचा उत्पन्नाचा स्रोत चांगलाच सुरू झाला आहे. मला घरी खूप वेळ मिळायचा, पण काम जास्त नसल्यानं खूप बोर व्हायचं म्हणून मी काहीतरी घरी राहून करता येईल असं काम शोधत होते. आता मी माझ्या कामात पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. इतर महिलांनाही मी सांगू इच्छिते बाळंतपणानंतर एक दोन वर्षांनंतर आपणासही काही न काही करता येऊ शकते, असं सुषमा सांगतात.