रायपूर -Traffic Police Found 45 lakh : छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. रायपूर मधील एका वाहतूक पोलिसाला रस्त्याच्या बाजूला लाखो रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हाती लागली. बॅगमध्ये फक्त ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा होत्या. तब्बल ४५ लाख रुपये रक्कम असलेली बॅग वाहतूक पोलिसाने हद्दीतील पोलीस ठाण्यात जमा केली. त्या पोलिसाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
निलंबर सिन्हा नाव असलेल्या या वाहतूक पोलिसाचे वरिष्ठांकडून मोठे कौतुक करण्यात आले असून त्याला बक्षीस देखील देण्यात आले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सुखनंदन राठोड यांच्या म्हणण्यानुसार “निलंबर हे रायपूर मधील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान, त्यांना रस्त्याच्या बाजूला एक बेवारस बॅग सापडली. त्या बॅग मध्ये तब्बल ४५ लाख रक्कम मिळाली होती. याबाबतची माहिती निलंबर यांनी तात्काळ वरिष्ठ पोलिसांना दिली सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनकडे बॅग जमा करण्यात आली.” अशी माहिती राठोड यांनी दिली. त्याचबरोबर ‘ती बॅग कोणाच्या मालकीची आहे याचा तपास अजून लागलेला नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
निलंबर सिन्हा या वाहतूक पोलिसाचे त्याच्या प्रामाणिकपणासाठी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.