ऊर्मिला विश्वनाथ कराड यांना श्रद्धांजली

पुणे : ज्येष्ठ कवयित्री, लेखक आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या पत्नी ऊर्मिला कराड यांना माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे बुधवारी कोथरूड येथील डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, प्रा. ज्योती कराड ढाकणे, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, प्रा. प्रकाश जोशी, डॉ.एस.एम.पठाण, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. रविकुमार चिटणीस, वरिष्ठ पत्रकार अरुण खो, पं. वसंतराव गाडगीळ, आचार्य रतनलाल सोनाग्रा, हिंदकेसरी दीनानाथ सिंग, केशवकुमार झा, मुकेश शर्मा, आदिनाथ मंगेशकर, ह.भ.प. नलावडे महाराज, बालाजी फुंदे, चंदू भोसले यांच्याबरोबरच अनेकांनी तत्त्वदर्शी प्रज्ञावंत वै. सौ. ऊर्मिला वि. कराड यांच्या आठवणींना उजाळा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपस्थितांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, वै. ऊर्मिला वि. कराड या ब्रह्मयोग तपस्विनी होत्या. त्यांनी जरी भौतिक जगाला निरोप दिला तरीही त्यांनी दिलेले संस्कार, सद्भावना आणि मूल्यांचे शिक्षण प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण आहे. आज एमआयटी शिक्षण मंदिरातील देवता अनंत प्रवासाला निघाल्या आहेत. काकूंनी ४० व्यक्तींच्या कुटुंबातील प्रत्येकाला संस्कार, शिक्षण देऊन खूप मोठे केले आहे. एमआयटी संस्थेच्या जडणघडणीत प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांनी मोलाची साथ दिली. सोबतच कवयित्री व लेखक म्हणून त्यांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यानंतर माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे विश्वस्त, संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, प्रकुलगुरू व कर्मचार्‍यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Sumitra nalawade: