उलगडत गेला संगीतमय गायनाचा प्रवास; किशोरकुमारांच्या ९४ व्या जन्मदिनानिमित्त गौरव

पुणे : तुडुंब भरलेले बालगंधर्व रंगमंदिर, मान्यवरांची मांदियाळी, किशोरकुमार यांनी गाऊन अजरामर केलेली हिंदी गाणी आणि त्याला तितक्याच तोलामोलाची साथ देणारा वाद्यवृंद या संगीतमय वातावरणात पुणेकर रसिकांची सायंकाळ सुमधुर आणि काहीशी स्मृतिरंजनात गेली. निमित्त होते हिंदीसह विविध भाषांमध्ये हजारो गाणे गाऊन ती गाणी आणि तो आवाज अजरामर करणारे किशोरकुमार यांच्या ९४ व्या वाढदिवसाचे आणि त्यानिमित्त प्रतिकिशोर, महाराष्ट्रातील नामवंत गायक आणि व्हॉइस ऑफ किशोरकुमार म्हणून प्रसिद्ध असणारे जितेंद्र भुरुक यांच्या सत्काराचे.

संवाद, पुणे आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीतर्फेे ज्येष्ठ पार्श्वगायक किशोरकुमार यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत गायक आणि व्हॉइस ऑफ किशोरकुमार म्हणून प्रसिद्ध असणारे जितेंद्र भुरुक यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती पी. डी. पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुणेरी पगडी देऊन गौरविण्यात आले. सत्कार सोहळ्यानंतर जितेंद्र भुरुक यांनी किशोरकुमार यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम सहवादक सादर केला. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे अध्य़क्ष सचिन ईटकर, संवाद संस्थेचे सुनील महाजन, राष्ट्रपतींच्या हस्ते वीरचक्र प्राप्त कर्नल ललित राय, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, युवराज शहा, प्रशांत पवार, बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे, प्रसिद्ध कवी अरुण शेवते उपस्थित होते.

पी.डी.पाटील म्हणाले, किशोरकुमार यांच्या आवाजात जादू होती. त्यांनी आणि राजेश खन्ना यांनी त्या काळातील महाविद्यालयीन युवकांच्या हृदयाचा वेध घेतला होता. त्यांच्या गायनाने आमची पिढी भारावून गेली होती. गायक जितेंद्र भुरुक यांनी किशोरजी यांच्या आवाजाची तीच लकब उचलून किशोरजींच्या आवाजाचा पुनर्प्रत्ययाचा अनुभव दिला आहे.

Dnyaneshwar: