भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू झाले आहे.
कुणी याला राष्ट्रवादी भावनेचे उदात्तीकरण म्हणतंय, तर कोणी नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा इव्हेंट म्हणून हिणवत आहे. घरावर झेंडा लावण्याच्या संकल्पनेवर तोंडसुख घेत प्रत्येक नागरिकाला घर देण्याच्या आश्वासनाची आठवण करून देते, तर अनेक जण तिरंग्याच्या संभाव्य अपमान व अवमानाशी याचा संबंध जोडते, हे सगळे खरे असले आणि यामागे मोदींचा प्रचारकी थाट असला तरी तिरंगा फडकवणे ही कृती अाक्षेपार्ह नाही आणि काकणभर का होईना, त्यामुळे राष्ट्राभिमान जागृत होतोय, हे तर्क या संकल्पनेचे समर्थन करण्यापुरते पुरेसे आहेत.
यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवर भारावलेले हे वातावरण अधिक उत्साहपूर्ण आणि नावीन्यपूर्ण करीत त्याला सृजनात्मक दिशा देण्याचे काम या ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे झालेले आहे, हे निश्चित…
प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच. राजकारणातील क्रियेला तर प्रतिक्रिया असणारच, किंबहुना क्रिया – प्रतिक्रिया, आरोप – प्रत्यारोपांच्या खेळाचेच नाव राजकारण असे आहे. त्यात नरेंद्र मोदी यांचा वाढता प्रभाव आणि सातत्याने राज्य काबीज करून एक शक्तिशाली नेता होण्याचे त्यांचे पूर्णत्वास जाणारे स्वप्न पाहता त्यांच्यावर प्रमुख विरोधी पक्ष व प्रादेशिक पक्षांसह अनेकांनी केलेली टीकादेखील स्वाभाविक मानली पाहिजे.
मागील वर्षीच्या थाळीनादापासून ते आजपर्यंतच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानापर्यंत प्रत्येक संकल्पनेवर टीका ही झालीच, परंतु तरीही संपूर्ण देशवासीय मोठ्या प्रमाणात या मोहिमेमध्ये सहभागी झाले, हे वास्तव नाकारून चालणार नाही. कदाचित नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक प्रचारकी थाटाचा यामध्ये अहंभाव दिसतही असेल, परंतु या कृतीच्या पाठीमागे वैयक्तिक नरेंद्र मोदी नसून ‘भारताचे पंतप्रधान’ आहेत, हा भाव ठेवून अनेकांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदविला आहे, हेदेखील वास्तव आहे.
भारावलेले वातावरण
आज हर घर तिरंगा अभियान साकारले जात असताना प्रचंड मोठा उत्साह देशवासीयांमध्ये दिसत आहे. ज्याप्रमाणे गणेशोत्सव आला, की त्या सात-आठ दिवसांमध्ये गणेशभक्तीने वातावरण भारावलेले असते किंवा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक आला, की देशप्रेमाने वातावरण भारावलेले असते, त्याच पद्धतीने यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा होण्याच्या पार्श्वभूमीवरदेखील भारावलेले हे वातावरण अधिक उत्साहपूर्ण आणि नावीन्यपूर्ण करीत त्याला सृजनात्मक दिशा देण्याचे काम या ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे झालेले आहे, हे निश्चित.
ध्वजवंदनात सामान्यांचा प्रत्यक्ष सहभाग
यानिमित्ताने मोदींवर होणारी टीका ही योग्य किंवा अवाजवी आहे किंवा नाही, हा विषय वेगळा, परंतु यानिमित्ताने स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आणि त्या ७५ वर्षांच्या समारंभामध्ये सोहळ्यामध्ये प्रत्येक भारतीय सहभागी झाला हेही सामान्य नाही. आजपर्यंत शासकीय कार्यालय राजकारण्यांच्या पक्ष कार्यालयांच्या तिरंगा ध्वजारोहणाचे कार्यक्रम आणि टीव्हीसमोर बसून राजपथाचे पाहिले जाणारे संचलन त्याच्यापलीकडे प्रत्येक नागरिकाला तिरंग्याच्या उभारणीचा सोहळा साजरा करताना ध्वजवंदनाचा आनंद घेता आला, हेदेखील एक वेगळेपण या वर्षाच्यानिमित्ताने दिसले.
जपानमध्ये ज्या पद्धतीने सक्तीचे सैनिकी शिक्षण आहे, त्याच्या पाठीमागे केवळ राष्ट्रीयत्वाची आणि देशप्रेमाची भावना या पिढीच्या मनामध्ये रुजावी, हा हेतू आहे. त्या दृष्टिकोनातून अनेक देशांनी सैनिकी शिक्षण शक्तीचे केले. भारतामध्येदेखील देशप्रेम आणि देशाप्रतीची निष्ठा कायम असावी, ही वाढीस लागावी, ही अपेक्षा व्यक्त होणे गैर नाही. त्यासाठी ७५ वर्षांच्या अवधीत त्याने ‘हर घर तिरंगा’सारखा उपक्रमदेखील या भावनेला हात घालणारा ठरू शकतो.
‘अग्निपंख’च्या मागे राष्ट्रीयत्वाचा हाच भाव
त्यामुळे या उपक्रमातून नेमके सकारात्मक काय साधले जाणार आहे आणि राष्ट्रवादासाठी नवीन पिढीच्या मनामध्ये कसा ठसण्यासाठी उपयुक्त होणार आहे ? याचा विचार केलेला बरा… मागील दोन महिन्यांपूर्वी अग्निपंख योजनेच्या माध्यमातूनदेखील मोदी सरकारने हाच प्रयत्न केला, त्याच्यावरदेखील प्रचंड टीका झाली.
परंतु सैनिकी शिस्तीची एक ‘नागरिक चळवळ’ जर उभी राहत असेल तर त्याच्यासारखा मोठा फायद्याचा विषय या देशाकरिता असू शकत नाही.
त्याला मिळणारे ११ लाख रुपये, त्याचे चार वर्षांचे नोकरी, त्यानंतरची येणारी अस्थिरता किंवा त्या अकरा लाख रुपयांच्या माध्यमातून भांडवली गुंतवणुकीच्या आधारे उभे राहणारे त्याचे जीवन… या सगळ्या गोष्टी आपण सोडून देऊयात, परंतु ‘सैनिकी शिक्षणाचे धडे’ चार वर्षे एखाद्या नागरिकाला मिळणे हीच एक फार मोठी उपलब्ध आहे. संपूर्ण देशातील काही टक्के जरी नागरिक या सैनिकी प्रशिक्षणातून गेले तर त्यांचे जीवन एका शिस्तबद्ध चौकटीमध्ये उभा राहून राष्ट्रीयत्वाच्या भावनेनेदेखील तो प्रेरित होऊ शकेल. हीदेखील त्यातील एक लाभाची छटा पाहिली पाहिजे.
टीकेला अन्य मुद्दे आहेतच
‘हर घर तिरंगा’ या अभियानामध्येदेखील याच पद्धतीने राष्ट्रीयत्वाची भावना उभी करण्याला फार मोठे बळ मिळाले आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारण, तसेच बिहारमधील सुरू असलेले राजकारण पाहता नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाची प्रतिमा फार काही चांगल्या पद्धतीने उभी राहत आहे, असे दिसत नाही. लोकांना या तडजोडी आणि राजकारणासाठी चाललेल्या खेळ्या समजत आहेत.
त्यातच सक्तवसुली संचालनालयासारखा व्यवस्थेचा वापर किंवा गैरवापर हेदेखील चर्चा आहे. या सगळ्या गोष्टी मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी उपयुक्त आहेत, परंतु ‘हर घर तिरंगा’सारखी एकराष्ट्रीयत्वाची भावना उभी करणाऱ्या संकल्पनेला केला जाणारा विरोध हा निश्चितच देशहिताचा नाही, हे मान्य केले पाहिजे.