प्रशांत किशोर या प्रवाहात डुबकी मारून सक्रिय राजकारणात येऊ पाहतात तेही बिहारसारख्या जातीयवादी आणि राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत पिळपेचाच्या राज्यामध्ये त्यामुळे त्यांचे कौतुक केले पाहिजे. नावात प्रशांत असले तरी राजकीय आखाड्यात ते किशोर आहेत आणि अशांत विचाराने या राजकीय आखाड्यात ते उतरणार असतील तर, यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय त्यांना पर्याय नाही. देशातील जनता शहाणी आहे आणि मतदार सुज्ञ असतात. यावर त्यांनी ठेच लागल्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वेक्षण करणार्या संस्थेकडून सर्वेक्षण करून घ्यावे आणि मगच स्वतःचा पक्ष काढण्याच्या तयारीस लागावे.
निवडणुकीचे व्यवस्थापन करणारे तज्ज्ञ प्रशांत किशोर शब्दशः अनेक राजकीय पक्षाच्या घाटांवरचे पाणी पिऊन आता स्वतःचा पक्ष काढण्याच्या विचारात आहेत. आठ दिवसांपूर्वीपर्यंत ते काँग्रेसमध्ये मोठ्या हुद्द्यावर स्थानापन्न होतील आणि ढासळत्या काँग्रेसच्या परिस्थितीला आधार देतील, असा अंदाज इतर राजकीय पक्षांचा आणि समाधान काँग्रेसजनांना वाटत होते. मात्र प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी करण्याचे रद्द करून स्वतःच्याच पक्षाची स्थापना करण्याचे ठरविले आहे. बिहारमध्ये याचा प्रारंभ करून बिहारचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न त्यांना पडले आहे. दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे केजरीवाल यांनी सत्ता काबीज करून शेजारच्या पंजाबमध्येसुद्धा दणदणीत यश मिळविले तसे आपल्याला करता येईल, असा विश्वास प्रशांत किशोर यांना वाटत असावा. स्वप्ने बघावीत यावर बंदी घालू शकत नाही. प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत केली होती आणि भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना धूळ चारत सत्ता हस्तगत केली होती. त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांना गुजरातचे तिसर्यांदा मुख्यमंत्री करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
यानंतर २०१५ बिहार, २०१७ उत्तर प्रदेश, २०१९ आंध्र प्रदेश आणि २०२१ मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणुकीचे रणनीतीकार म्हणून काम केले. ममता बॅनर्जी यांना मिळवून दिलेले यश ही त्यांची महत्त्वाची जमा राशी आहे. या निवडणुकीनंतरच काँग्रेसने त्यांना पक्षच्या सरचिटणीसपदासाठी पायघड्या घातल्या होत्या, परंतु त्यांनी त्या नाकारल्या. भारतीय जनता पक्ष, जनता दल, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर निवडणुकांध्ये काम केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही प्रशांत किशोर यांच्या कार्याची भूल पडली आहे. शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांच्याबरोबर निवडणुकांसंदर्भात चर्चाही केली आणि प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत भाजपविरोधातील सर्व पक्ष एकविचाराने एकत्र येत नाहीत तोपर्यंत भाजपला काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष पराभूत करू शकत नाहीत.
काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांमध्ये नवा पक्ष काढल्यावर प्रश्न किशोर सहभागी होणार की, भारतीय जनता पक्षात हे कोडे त्यांच्या राजकीय व्यावसायिकतेवर अवलंबून असेल. सध्या तरी ते व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करीत आहेत. प्रत्यक्ष जमिनीवर उतरल्यावर त्यातील खाचाखोचा अधिक स्पष्टपणे त्यांना समजतील. प्रशांत किशोर यांना विकत अनुभव घ्यायचा असेल तर, त्यांना सगळे पक्ष नक्कीच शुभेच्छा देतील. निवडणुकीमध्ये सल्ला देणे, मार्गदर्शन करणे हा एक भाग आणि स्वतः पक्ष काढून आपल्या विचारकल्पनांना प्रत्यक्षात उतरविणे हा प्रकार वेगळा आहे. खरेतर राजकीय पक्षांना अशा प्रकारचे सल्लागार आणि निवडणूक जिंकून देण्यासाठी रणनीतीकार लागतात, ही लाजिरवाणी बाब आहे. अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या सल्लागारांचा गट अध्यक्षीय निवडणुकांमध्ये काम करीत असतो. अमेरिकेतील निवडणुकांचा पोत वेगळा आहे. तेथील प्रश्न, नागरिकांच्या समस्या, विचार, आर्थिक परिस्थिती वेगळी आहे.
तिथले राजकारण आतंरराष्ट्रीय व्यापार आणि अर्थकारणाशी निगडित असते. बर्याचदा या निवडणूक भावनिक पातळीवर न लढवता व्यावसायिक मुद्द्यांवरच लढविल्या जातात. याउलट भारतीय राजकारणाची परिस्थिती आहे. इथे प्रश्न समस्यांऐवजी भावनिक मुद्द्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये रुजवले जाते. मूलभूत प्रश्नांऐवजी भावनिक मुद्द्यांना ताकदीने मतदारांसमोर सादर केले जाते. त्यामुळे भारतातील राजकीय पक्षांनी व्यावसायिक विचार करून प्रशांत किशोर यांच्यासारखे सल्लागार नेमले तरी तेसुद्धा भावनांचे बाजारीकरण करूनच राजकीय पक्षांना विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. राजकीय पक्षांमध्ये कोणतीही तत्त्वे, विचारप्रणाली नसल्याने तसेच कार्यकर्तेनिर्मितीसाठी उपक्रम, कार्यशाळा, चिंतन शिबिरे, अभ्यासवर्ग हे सगळे कालबाह्य झाले असल्यामुळे पक्षाचे विचार, तत्त्वे मतदारांपर्यंत पोहोचविणे हा प्रकार संपुष्टात आला आहे.
केवळ निवडणुकांपूर्वी महिनाभर इव्हेन्ट मॅनजेमेंटप्रमाणे काम केले की, पाच वर्षे सत्ता मिळू शकते. हा नवा प्रकार , प्रवाह राजकारणात रुजू होतो आहे. प्रशांत किशोर या प्रवाहात डुबकी मारून सक्रिय राजकारणात येऊ पाहतात , तेही बिहारसारख्या जातीयवादी आणि राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत पिळपेचाच्या राज्यामध्ये त्यामुळे त्यांचे कौतुक केले पाहिजे. नावात प्रशांत असले तरी राजकीय आखाड्यात ते किशोर आहेत व वैचारिक शोर करून या राजकीय आखाड्यात ते उतरणार असतील, तर यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय त्यांना पर्याय नाही.