औरंगाबाद : सध्या राज्यात एकत्र असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतला स्थानिक संघर्ष चांगलाच तापताना दिसत आहे. तसंच आता शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावतात असा खळबळजनक आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
राज्यातील सत्तेत सोबत असतानाही सत्तेचा वाटा मिळत नसून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सतत केला जात आहे. पण यातच आता शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जात असल्याचा गंभीर आरोप राजेश टोपे यांनी केला आहे. नाव न घेता हा आरोप शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांच्यावर केला आहे.