पुण्यात धावणार दुचाकी रुग्णवाहिका; वाहतूक कोंडीवर अनोखा उपाय

पुणे | शहराचा वाढता विस्तार, वाहनांची संख्या यासह सर्व बाबी लक्षात घेता नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडल्याचे चित्र वारंवार दिसते. यामुळे आता दुचाकी रुग्णवाहिकेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता पुण्यातील रस्त्यांवर दुचाकी रुग्णवाहिका धावणार असून, वाहतूक कोंडीतूनही त्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवतील.

एखाद्या रुग्णाला आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात नेण्यासाठी पहिली पाच ते सात मिनिटे हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. पुण्यातील वाहतुकीची खराब स्थिती पाहता हा वेळ तब्बल ३० ते ४० मिनिटांवर पोहोचला आहे. रुग्णाला रुग्णालयात नेण्यास होणारा विलंब हा त्याच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच अनेक जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे रूबी हॉल क्लिनिकने दुचाकी रुग्णवाहिका हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात रुग्णालयाचे मुख्य कार्यपालन अधिकारी उर्वक्ष भोट आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज यांच्या हस्ते झाले.

एखाद्या रुग्णाला आपत्कालीन स्थितीत त्याच्या घरातून अथवा इतर ठिकाणाहून रुग्णालयात आणण्यासाठी दुचाकी रुग्णवाहिकेचा वापर होईल. या रुग्णवाहिकेत अत्यावश्यक औषधे, ईसीजी यंत्र, आपत्कालीन उपचाराची साधने आणि इतर उपकरणे असतील. यामुळे रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेला जीपीएस यंत्रणा बसविलेली असेल. त्यामुळे रुग्णालयातून या रुग्णवाहिकेला वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी योग्य दिशादर्शन केले जाईल, अशी माहिती रुबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी यांनी दिली.

Bhakti Chalak: