“हल्ला करणाऱ्यांची मला कीव येते…’, हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Uday Samant’s First Reaction After The Attack – शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर काल (2 ऑगस्ट) पुण्यातील कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचं शिंदे गटाचं मत आहे. मात्र या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण हिंसक झाल्याचं चित्र आहे. याच दरम्यान, घडलेल्या या प्रकारावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी उदय सामंत म्हणाले, आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी सुखरूप आहे. मला कोणतीही ईजा झालेली नाही. सुभाष देसाईंच्या आणि हल्ले करणाऱ्यांच्या अकलेची मला कीव करावीशी वाटते. लोकशाहीमध्ये एखादा विचार बदलणं चांगल्या गोष्टींसाठी उठाव करणं याचा परिणाम अशा हल्ल्यात होत असेल तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. घडलेल्या प्रकारावर मी फार बोलत नाही याचा अर्थ मी हतबल आहे असा नाही.

राजकारणाची लढाई ही विचारांची असते. त्यामुळे विकासाबाबत विचार करावा, कालचा जो हल्ला झाला तो ज्यांनी केला त्यांची मला कीव येते. टीकेचं उत्तर विकासकामे करुन द्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. मी बोलत नाही. उत्तर देत नाही प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ माझ्यावर चांगले संस्कार आहेत. मी काहीच करु शकत नाही असा जर कोणाचा गोड गैरसमज असेल तर चुकीचं आहे. मी सामान्य कार्यकर्ता असतो आणि माझ्या नेत्यांनी असं केलं असतं तर मी स्वत: त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं, असंही सामंत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, राजकारण हे आरोग्यदायी असलं पाहिजे. मात्र हे राजकारण हिंसक होत आहे. कात्रजमध्ये आदित्य ठाकरेंचं आक्रमक भाषण झालं होतं. त्यांनी आम्हाला अर्वाच्च भाषेत बोलणं गद्दार म्हणणं यात काही नवीन नाही. मात्र हत्यारं घेऊन लोकं जर सभेला येत असतील तर हे चुकीचं आहे. माझी गाडी जात असताना मला वाईट भाषेत बोलत होते. त्यानंतर अनेक तरुणांनी हल्ला करायला सुरुवात केली. मात्र त्या हल्ल्यात मी वाचलो. मात्र राजकारणाची पातळी घसरली आहे. याचं प्रतिक म्हणजे कालचा हल्ला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या सगळ्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. सेना स्टाईलने उत्तर देऊ अशा धमक्या देतात तर नारायण राणेंना नाव ठेवायचा यांचा अधिकार नाही, असं देखील उदय सामंत म्हणाले.

Sumitra nalawade: