उदयनराजेंचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले, “मी पाच रुपयाचा घोटाळा केला असता तर…”

सातारा | Udayanraje Bhosale On Sharad Pawar – सध्या सातारा पालिकेची निवडणूक जवळ येत असून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यामध्ये साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्याच वाद रंगला आहे. याच दरम्यान उदयनराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सातारा पालिकेत आम्ही पैसे खाल्ले असते तर तुम्ही सगळ्यांनी हेडलाईन केली असती. पण, आम्ही कोणतंही गैर काम करत नाही, गैर खपवून घेत नाही. तसं असतं तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का? असा सवाल करत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी उदयनराजे म्हणाले, मी पाच रुपयाचा घोटाळा केला असता तर त्यांनी (शरद पवार) फोकस करून माझ्यावर आरोप केले असते, अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. तसंच भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी केलेल्या आरोपाला त्यांच्याच शैलीत उदयनराजेंनी प्रतिउत्तर दिलं आहे.

“वारंवार आमच्याविरोधात आवाज उठवत भ्रष्टाचार केला म्हणत आहेत. पण, भ्रष्टाचाराचे स्पेलिंग मला माहिती नाही. तसं असतं तर जे ज्येष्ठ विचारवंत माझ्यावर आरोप करतात, त्यांना थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे. सत्ता असो वा नसो नगरसेवकांपासून सुरूवात मी केली. त्यावेळेपासून तळमळीने आम्ही काम करत आहोत. आम्ही अनेक आंदोलनं केली आमच्यावर केसेस झाल्या. पण आमच्याकडे सत्ता नसल्यानं पर्याय नव्हता. नियोजन शून्य अक्कल शून्य अशी नावं ठेवली गेली. गावाने ओवाळून टाकलेली उदयनराजे व त्यांची सगळी टीम आहे, असे आरोप झाले. पण आम्ही नागरीकांच्या आरोग्याला धोका होता कामा नये, अशी आमची भावना आहे. आम्ही कोणतंही गैर काम करत नाही. तसंच गैर कामे खपवून घेत नाही. तसं केलं असतं त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी मला ठेवलं असतं का? पाच रूपये इकडे तिकडे झाले असते तरी त्यांनी फोकस करून आमच्यावर आरोप केले असते, अशा शब्दात उदयनराजेंनी पवारांवरही निशाणा साधला.

Sumitra nalawade: