सातारा : (Udayanraje Bhosale On Shivendraraje Bhosale) आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंच्या आंदोलनाची खिल्ली उडवत त्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करावे, असा सल्ला दिला होता. त्यावर खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आम्ही आंदोलन करत नाही. तसेच कोण काय बोलतंय याकडेही लक्ष देत नाही. प्रत्येकाची बुद्धी असते त्याप्रमाणे बोलतात. त्याला मी फारसे महत्व देत नाही.
महाराष्ट्रात जे घडले त्याबाबत लोकांत जागृती केली पाहिजे. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोक मोठी होऊ शकत नाहीत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून लगावला. ते म्हणाले, लोकशाहीत मतदार हा राजा असतो. त्यांच्याशिवाय कोणताही पक्ष मोठा होऊच शकत नाही. त्यांनी दखल घेतली नाही. पण, लोकांनी त्यांची दखल घेतली तर अडचण होईल. कोणत्याच पक्षाने दखल घेतली नाही, त्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही टप्याटप्प्याने पुढे जाणार आहोत, असं उदयनराजे म्हणाले.
जे घडलंय त्याविषयी लोकांना सांगितले पाहिजे. यात कोणतेही राजकारण नाही. पण, येथील लोकप्रतिनिधी म्हणतात राजकारण करत आहेत. छत्रपतींचा अवमान होत असेल या वाड्यात मलाच काय त्यांनाही व इतर कोणालाच राहण्याचा अधिकार नाही. घराण्याचे नाव लावतात, मात्र करणार काहीच नाहीत. जे काय राजकारण करायचे ते करु देत त्यांना. पण, आम्हाला लेाकांची सेवा आणि समस्या सोडवायच्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊनच पुढे वाटचाल करायची आहे, असं उदयनराजे म्हणाले.