मुंबई | Uddhav Thackeray Live On Facebook – सध्या राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करताना म्हणाले, अडीच वर्षात जे मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनं दिलं आहे. मी जिद्दीनं लढणारा माणूस आहे. शरद पवारांनी मला सांगितलं म्हणून मी मुख्यमंत्रीपद स्विकारलं. रडकुंडीचं राजकारण उपयोगाचं नाही, वर्षा आता सोडून मी मातोश्रीवर जायला तयार आहे . जर एखादा शिवसैनिक मुख्यमंत्री होऊ इच्छित असेल तर मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. मी राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवले आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मला दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसावेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं. तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको, असं तोंडावर सांगावं. ज्यांना मी नकोय, त्यांनी समोर येऊन सांगावं. आज संध्याकाळपासूनच मी मुक्काम वर्षाहून मातोश्रीवर हलवणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो. जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत ४० हून अधिक आमदार घेऊन गुवाहाटीला गेल्याची माहिती आहे. हे सर्व कटकारस्थान एकटे शिंदे करू शकत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याशिवाय आमदारांचं अपहरण शक्य नाही, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.