जळगाव : (Uddhav Thackeray On Devendra Fadnavis) शेतकऱ्यांना पीकविमा दिला जात नाही, उज्ज्वला गॅस अंतर्गत महिलांना गॅस दिला जात नाही, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नाही, सर्व काही नाही, नाही म्हणणाऱ्या या केंद्रातील मोदी सरकारला येत्या २०२४ च्या निवडणुकीत जनता सत्तेवर ठेवणार नाही. त्यांना हटविणार म्हणजे हटविणारच, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगाव येथील मानराज पार्कजवळील मैदानात झालेल्या जाहीर सभेत दिला.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, ते आता इंडिया नाव बदलून ‘भारत’ म्हणायला लागले आहेत. परंतु आम्ही इंडिया, भारत आणि हिंदुस्थानही म्हणणार आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे ‘शिवसेनेची काँग्रेस होऊन देणार नाही’ असे फलक विरोधक लावत आहे.
होय, मी शिवसेनेची काँगेस होऊच देणार नाही. २५ वर्षे सोबत राहून शिवसेनेची भाजपही झालेली नाही. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी केलेली नाही. आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही, त्यांनी तसा प्रयत्न केल्यास त्यांना आम्ही मोडून तोडून टाकणार आहोत.
जालना येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला. ते अतिरेकी असल्याप्रमाणे त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, जालन्याचे जालियानवाला बाग केले. महाराष्ट्रात ही राक्षसी औलाद कशी आली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.